सुरक्षेसाठी हरिनिवास ते मल्हार चौकापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद

ठाणे : ठाणे येथील नौपाडा भागात निर्माणाधीन इमारतीला शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत इमारतीवर उभारण्यात आलेल्या परांचीची लाकडे जळून खाली पडत होती. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हरिनिवास ते मल्हार चौकापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दुपारच्या वेळेत वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नसली, तरी नागरिकांना मात्र वळसा घालून प्रवास करावा लागत होता. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ठाणे येथील नौपाडा भागात इमारत उभारणीचे काम सुरू आहे. हरिनिवास ते मल्हार चौक या मार्गालगतच ही इमारत आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी इमारतीच्या १७व्या मजल्यावर आग लागली. याठिकाणी बांधकामाच्या उभारणीसाठी लागणारे लाकडी साहित्य ठेवण्यात आले होते. या साहित्याने पेट घेतल्यामुळे आग वाढली. याबाबत माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग विझविण्यासाठी ब्रान्टो हे मोठे अग्निशमन वाहन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्ता अरुंद असल्यामुळे हे वाहन घटनास्थळापर्यंत नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे जवानांनी १७ व्या मजल्यावर जाऊन एक अग्निशमन बंब आणि दोन टँकरच्या साहाय्याने ही आग विझविली.

या आगीत इमारतीवर उभारण्यात आलेल्या परांचीची लाकडे जळून खाली पडत होती. ही इमारत रस्त्यालगत असल्यामुळे पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हरिनिवास ते मल्हार चौकापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दोन तासांच्या अवधीनंतर ही आग पूर्णपणे विझविण्यात अग्निशमन जवानांना यश आले. त्यानंतर वाहतुकीसाठी बंद केलेला मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. आगीचे वृत्त कळताच कामगार इमारतीतून बाहेर पडले. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.