निवडणुकीपूर्वी आकांडतांडव करणारे राजकीय पक्ष चिडीचूप

महापालिका निवडणुकीपूर्वी दिव्यातील कचराभूमीच्या प्रश्नावरून रान उठवणाऱ्या राजकीय नेत्यांना गेल्या काही दिवसांपासून धुरात गुरफटलेल्या दिवावासीयांचा विसर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिव्यालगतच्या कचराभूमीवर आगी लागण्याचे प्रकार वाढीस लागले असून येथून उठणारे धुराचे लोट अवघ्या शहरभर पसरत आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या आधी कचराभूमी हटवण्याच्या मागणीसाठी कचऱ्याच्या ढिगावर तंबू ठोकून बसणारे नेते आता मात्र मूग गिळून बसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत दिवा परिसरातून ११ जागा निर्माण झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या शहराला विशेष महत्त्व दिले होते. गतवेळच्या निवडणुकीत या भागातून चांगली मते मिळवणाऱ्या मनसेने तर जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दिवावासीयांना वारंवार छळणाऱ्या कचराभूमीचा मुद्दा मनसेने प्रामुख्याने हाती घेतला होता. ही कचराभूमी हलवावी या मागणीसाठी मनसेचे नेते कचराभूमीलगत तंबू टाकून उपोषणाला बसले होते. मात्र, यानंतरही पालिका निवडणुकीत मनसेला मतदारांची साथ मिळाली नाही. त्यामुळेच की काय निवडणुकीपूर्वी आक्रमक पवित्रा घेणारे मनसेचे नेतेही सध्या कचराभूमी पेटत असताना शांत आहेत. दुसरीकडे, निवडणुकीच्या काळात दिवावासीयांवर विकासाच्या घोषणांची बरसात करणारा भाजप आणि या परिसरातून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेलाही कचराभूमीच्या प्रश्नाचा विसर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कचराभूमीवर आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. या आगीच्या धुरामुळे अवघ्या शहरातील नागरिकांना त्रास होत आहे. परंतु, राजकीय नेतेमंडळी व प्रशासन यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

रेल्वे स्थानक परिसरात आम्ही राहतो, येथून कचराभूमी साधारण दीड ते दोन किमीच्या अंतरावर आहे. कचऱ्याचा हा धूर आजूबाजूच्या परिसरात लांबपर्यंत पसरत असून सर्वच नागरिकांना त्याचा त्रास होतो. आरोग्यावरही याचा दुष्परिणाम होत आहे.

– प्रथमेश परब, रहिवासी.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत तीन महिन्यांत ही कचराभूमी बंद करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. आता दोन महिन्यांचा कालावधी संपत आला असून पालिकेने याविषयी नक्की काय पावले उचलली आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी. उन्हाळा असल्याने आता कचऱ्याला आग लागण्याचे प्रमाण वाढेल मात्र ही आग विझविण्यासाठी त्वरित यंत्रणा उपलब्ध होईल अशी सुविधा शहरात हवी.

– सोनाली बांदेकर, रहिवासी.

आम्ही महेश गुप्ते यांना कोणतीही मारहाण केलेली नाही. अन्य अधिकारी उपस्थित असताना आम्ही  कशी काय त्यांना मारहाण करू शकतो. प्रभागातील कामे अधिकाऱ्यांच्या मागे लागून करून घेणे हे आमचे काम आहे. गुप्ते यांनी आपल्या विरोधात तक्रार केली तर आपणही त्यांच्या विरुद्ध तक्रार करणार आहोत.

– शैलेश धात्रक, नगरसेवक, भाजप