आग मानवनिर्मित असल्याचा पर्यावरणप्रेमींचा संशय

ठाण्याच्या जंगलांमध्ये वारंवार वणवे पेटत असल्याने ते रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाय करा, असे आदेश खुद्द वनमंत्र्यांनी देऊनही गेल्या काही दिवसांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊरकडील बाजूस वणव्याचे सत्र सुरू आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला येऊर तसेच घोडबंदर, मानपाडा परिसरातील जंगलात गेल्या तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी वणवे लागत आहेत. उन्हाळ्यात पालापाचोळ्याच्या घर्षणाने वणवे लागण्याचे प्रकार सर्वाधिक घडत असल्याच्या चर्चा होत असल्या, तरी सातत्याने एकाच जागी वणवे पेटत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांकडून येऊर पर्यावरण सोसायटीकडे करण्यात येत असल्याने मानवनिर्मित वणवे लावण्याचे कृत्य यंदाही कायम आहे.

Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह ठाणे, शहापूर दाट जंगलांमध्ये सातत्याने वणवे पेटत असल्याच्या घटना घडत असल्याने राज्य सरकारने २०१६ मध्ये जंगलांमध्ये लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे आदेशही सरकारने वनाधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या वणव्यासंदर्भातील सविस्तर अहवाल वनसचिवांकडे सादर करण्याच्या सूचनाही राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या होत्या. त्यादृष्टीने जंगलाजवळच्या परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाडय़ावर वणवा लावू नये यासाठी वन विभागातर्फे सातत्याने जागृती करण्यात येते. तसेच वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागातर्फे जाळरेषा हा प्रतिबंधात्मक उपाय फेब्रुवारी महिन्यात राबवण्यात येतो. या उपक्रमाच्या अंतर्गत रस्त्यालगतच्या गवताची कापणी करून तो भाग पेटवण्यात येत असल्याने आग आटोक्यात येण्यास मदत होते. तसेच जंगलात ‘फायर वॉचर’च्या माध्यमातून वणवे लागल्यास माहिती मिळते. मात्र वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागातर्फे उपाययोजना राबवण्यात येत असल्या तरी यंदाही हे वणवे बवण्यासाठी वन विभागाला अपयश येत आहे. हे वणवे मानवनिर्मितच असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या जंगलात आदिवासी पाडे आहेत. या वस्त्यांलगतच गेल्या तीन दिवसांपासून वणवे लागत असल्याचे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे निरीक्षण आहे. वाघबीळ, मानपाडा, निळकंठ रो हाऊसच्या मागील भाग तसेच लोकमान्यनगर, वागळे इस्टेट परिसराच्या जवळ असलेल्या जंगल परिसरात वणवे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक संस्थेकडे करत असल्याचे येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे रोहित जोशी यांनी सांगितले.

पीक घेण्यासाठी जंगलाजवळच्या आदिवासी पाडय़ावरील काही ग्रामस्थांकडून राब काढण्यासाठी जमिनीवर उगवलेले गवत जाळले जाते. जमीन जाळल्याने कीटाणू नष्ट होऊन पीक चांगले येत असल्याने आदिवासी उन्हाळ्यात जंगलातील गवत जाळतात. मात्र वन विभागातर्फे वणवे पेटवू नये यासाठी आदिवासींना वारंवार सूचना देण्यात येतात, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे परिक्षेत्र वनअधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले.

वन विभागातर्फे वणवे आटोक्यात आणण्यासाठी वारंवार प्रयत्न होत असतात. गेल्या दोन दिवसात येऊर परिसरात लागणाऱ्या वणव्यांविषयी चौकशी करण्यात येईल. अनेकदा हे वणवे जागेच्या वादातून लावले जातात. जंगल पेटवणे हा गुन्हा आहे. यानुसार येत्या दोन दिवसात येऊरमधील वणव्यांच्या संदर्भात चौकशी करण्यात येईल आणि त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

बी.पी. भालेकर, जिल्हा वन अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान