वाऱ्यांच्या झोतामुळे ठिणग्यांचे वारंवार प्रज्वलन; आग आटोक्यात आणणे कठीण
आधारवाडी कचराभूमीला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहे. मागील आठवडय़ात कचराभूमीला मंगळवारी सायंकाळी आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तीन दिवस अग्निशमन दल प्रयत्न करीत होते. कचऱ्यामधून धूर निघत असला तरी आगीवर नियंत्रण ठेवण्यात अग्निशमन दलास अद्याप यश आले नसून रविवारी पुन्हा लागलेली आग अजूनही धुमसत असल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत आधारवाडी कचराभूमीला आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. कचऱ्यातून मिथेन वायू तयार होऊन आग लागण्याचे प्रमाण वर्षांनुवर्षे वाढू लागले आहे. कचराभूमीची क्षमता संपल्याने न्यायालयाच्या आदेशाने ती बंद करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
यासंबंधीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. बारावे भरावभूमी सुरू करण्यास तेथील नागरिकांनी विरोध केल्याने कंत्राटदाराने आधारवाडी कचराभूमी बंद करण्याचे काम अद्याप सुरू केलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे आधारवाडी कचराभूमीचा प्रश्न ‘जैसे थे’ असून वाढत्या कचऱ्यामुळे आग लागून धूर पसरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसांत आग लागण्याचे प्रमाण वाढते असे असले तरी रविवारपासून शहरात दमट वातावरण आहे. असे असूनही कचऱ्याला खाडी किनाऱ्याच्या दिशेने पुन्हा आग लागली. वाऱ्याच्या झोतामुळे ही आग वाढत असून ती आटोक्यात आणणे अग्निशमन विभागास शक्य होत नसल्याचे चित्र आहे.
मागील वर्षीही उन्हाळ्याच्या दिवसांत कचऱ्याला वारंवार आग लागत होती. या कचऱ्याला जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचे पुरेसे पुरावे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हाती आले असल्याचा दावा त्या वेळी उपायुक्त सुरेश पवार यांनी त्या वेळी केला होता. तसेच यासंबंधी काही छायाचित्रेही महापालिकेच्या हाती लागली असून अशा व्यक्तींचा शोध घेता यावा यासाठी पोलीस ठाण्यात यासंबंधीच्या तक्रारी नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या पुराव्यांचे पुढे काय झाले, असा सवाल आता उपस्थित होत आहे. याविषयी सुरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

आग पूर्ण आटोक्यात नाही
घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त धनाजी तोरसकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आग लावली जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. गेल्या आठवडय़ात मंगळवारी लागलेली आग ही पूर्ण आटोक्यात आली नव्हती. कचऱ्याच्या वरच्या थरावर पाण्याचा मारा केल्याने आग विझली असली तरी ती आत खोलवर गेली असण्याची शक्यता आहे. वाऱ्याच्या झोतामुळे ठिणग्या पुन्हा पेट घेऊन आग लागत आहे. त्यामुळे ती आटोक्यात आणणे कठीण होत आहे, असे त्यांनी सांगितले. आग लागत आहे की लावली जात आहे हे पडताळून पाहात आहोत, असेही ते म्हणाले.