उल्हासनगरात कारखान्याला आग; सुट्टी असल्याने जीवितहानी नाही

उल्हासनगर : येथील कॅम्प तीन भागातील पवई चौक परिसरात असलेल्या बॅग कारखान्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने कारखाना बंद होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत मालाचे मोठे नुकसान झाले असून मध्य रेल्वेच्या रुळांना लागून असलेल्या या कारखान्याला लागलेल्या आगीमुळे काही काळ रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात आली होती, तर महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या भाविकांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील पवई चौक परिसर हा बॅग निर्मितीच्या कारखान्यांचा भाग म्हणून ओळखला जातो. याच पवई चौकातील रेल्वे रुळाला लागून असलेल्या शिवसाई अपार्टमेंट या सहा मजली इमारतीच्या तळघरात असलेल्या प्रिया बॅग हाऊस या कारखान्याला शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच उल्हासनगरच्या अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता अधिक असल्याने कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. व्यासायिक इमारत असलेल्या शिवसाई अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर काही आस्थापना आहेत. त्यांना आगीची झळ बसू नये म्हणून त्यातील कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. तसेच यावेळी आग लागण्याची शक्यता असलेले इतर साहित्यही इमारतीतून हटवण्यात आले होते. सुदैवाने शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने कारखान्यान कामगार नव्हते. त्यामुळे जीवित हानी टळली. मात्र कारखान्यातील मालाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कारखान्याची इमारत रेल्वे रूळांना लागून असल्याने या ठिकाणी लागलेल्या आगीच्या धुराचे लोट रेल्वे रुळांवरही पसरले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी मुंबईकडून येणारी आणि जाणारी अशी दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती, तर पवई चौकातून जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरही दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक रोखून धरण्यात आली होती. या भागात महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरत असते. त्या भाविकांनाही याचा मोठा फटका बसला. दोनच्या सुमारास येथील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.