13 August 2020

News Flash

शिळफाटय़ावर आगीची कोठारे!

शिळफाटा भागात लाकडी जुन्या वस्तू विक्रीची गोदामे आणि अवजड वस्तूंच्या बांधणींसाठी लागणाऱ्या लाकडाचे साचे बनविण्याचे कारखाने आहेत.

मुंब्रा-शिळफाटा रस्त्यावरील भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. यात आसपासची गोदामांनीही पेट घेतला.

आशीष धनगर

बेकायदा गोदामे, कारखान्यांतील अग्निसुरक्षा बेदखल; मोठय़ा दुर्घटनेची भीती

वाहनांच्या सततच्या वर्दळीने गजबजलेला शिळफाटा परिसरात रस्त्याच्या कडेला आगीची ‘कोठारे’ निर्माण होऊ लागली आहेत. या रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या बेकायदा गोदामे आणि कारखान्यात प्लास्टिक वस्तूंवर प्रक्रिया करण्याचे उद्योग सुरू असून त्यासाठी  भट्टय़ाही चालवण्यात येत आहेत. मात्र, या ठिकाणी अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्यामुळे येथे सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या भट्टय़ा  आणि उघडय़ावरील तारा यामुळे आग लागण्याचे प्रकार वाढीस लागल्याची कबुली ठाणे महापालिकेचा अग्निशमन विभाग देत असला तरी या उद्योगांवर कारवाई करण्यात मात्र कुचराई होताना दिसत आहे.

शिळफाटा भागात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक वस्तूंवर प्रक्रिया करणारे कारखाने आणि गोदामे आहेत. त्यापैकी बहुतांश गोदामे प्लास्टिक आणि लोखंडी पत्र्यांच्या आधारे बेकायदा उभी करण्यात आली आहेत. या कारखान्यांच्या आवारातच प्लास्टिकचा कच्चा माल गोणीमध्ये भरून ठेवलेला असतो. कारखान्यातील भट्टय़ांमध्ये कच्चा माल वितळवून त्यापासून विविध वस्तू तयार केल्या जातात. त्यासाठी या कारखान्यांमध्ये भट्टय़ाही उभारण्यात आल्या आहेत. मात्र, येथे अग्निसुरक्षा उपकरणे अभावानेच आढळतात. परिणामी कारखान्यांमध्ये आग लागल्यास प्लास्टिकमुळे ती रौद्र रूप धारण करते व अग्निसुरक्षा उपकरणे नसल्यामुळे आगीवर पटकन नियंत्रण मिळवता येत नाही.  विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेचे अग्निशमन केंद्र शिळफाटय़ापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यामुळे शिळफाटा भागातील घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागते.

शिळफाटा भागात लाकडी जुन्या वस्तू विक्रीची गोदामे आणि अवजड वस्तूंच्या बांधणींसाठी लागणाऱ्या लाकडाचे साचे बनविण्याचे कारखाने आहेत. या सर्व गोदामांमध्ये मोठय़ा प्रमाणात माल भरलेला असतो. अशी साधारण शेकडो गोदामे या भागात आहेत. कोणताही कारखाना अथवा गोदाम सुरू करण्यापूर्वी अग्निसुरक्षा यंत्रणा बसवून त्यांची सर्व माहिती अग्निशमन दलास सादर करावी लागते. त्यानंतर कारखाने आणि गोदामांना परवानगी दिली जाते. मात्र, या ठिकाणी बेकायदा गोदामे असल्यामुळे तेथील मालकांनी अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

प्लास्टिकच प्लास्टिक

शिळफाटा भागात मोठय़ा प्रमाणात तंबू उभारून प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे कारखाने उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणांहून आणलेले टाकाऊ प्लास्टिक या कारखान्यामध्ये आणले जाते. त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आणि लहान मोठय़ा आकाराच्या औषधांच्या रिकाम्या बाटल्यांचा समावेश असतो. हे सर्व साहित्य केवळ पाण्याने साफ करून भट्टय़ांमध्ये वितळविण्यासाठी टाकले जाते. या वितळवलेल्या प्लास्टिकपासून विविध वस्तू बनवण्यात येतात.

शिळफाटा भागात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे कारखाने उभे राहिले आहेत. या सर्व कारखान्यांध्ये प्लास्टिक वितळवण्यासाठी आगी लावण्यात येतात. मात्र, याठिकाणी कोणत्याही प्रकारची अग्निप्रतिबंधक यंत्रणा नाही. या सर्व प्रकाराची महापालिका आणि स्थानिक पोलीस दखलच घेत नाहीत. त्यामुळे मोठय़ा दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

– मंगल पाटील, स्थानिक रहिवासी

शिळफाटा भागातील गोदामांना आग का लागते, याबाबत तपासणी सुरू आहे. असे असले तरी या कारखान्यांमध्ये प्लॉस्टिक वितळविण्यासाठी उभारलेल्या भट्टय़ा, उघडय़ावरील विद्युत तारा, कामगारांनी फेकलेली जळती विडी अशा कारणांमुळे ही आग लागत असण्याची शक्यता आहे. तसेच बेकायदा गोदामांना किंवा कारखान्यांना अग्निशमन परवानगी दिली जात नाही.

– शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे

मुंब्रा-शिळफाटा रस्त्यावरील भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. यात आसपासची गोदामांनीही पेट घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 12:10 am

Web Title: fireplace in shilphata
Next Stories
1 चौकटीबाहेरच्या करिअर संधी कोणत्या?
2 मुंब्रा पुलाची दुर्दशा
3 करिअरच्या कोणत्या वाटेवर हमखास यश?
Just Now!
X