फटाक्यांचा आवाज १२५ डेसिबलपेक्षाही मोठा * हिरानंदानी मेडोज, राममारुती रस्त्यावर दणदणाट
दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबद्दल सामाजिक संस्थांकडून वेळोवेळी जनजागृती केली जात असली तरी ठाण्यात यंदाही दिवाळी फटक्यांचा आवाज टिपेला पोहोचल्याचे चित्र पुढे आले आहे. उपद्रवी आवाजाविरोधात कार्यरत असलेल्या जनहित याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी शहरातील विविध भागांमध्ये घेतलेल्या आवाजाच्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे. दिवाळी काळात शहरातील आवाजाची पातळी १२५ डेसिबलपेक्षाही अधिक होती. तसेच घोडबंदर भागातील हिरानंदानी मेडोज परिसरात आवाजाची पातळी १३० डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. गोखले मार्ग, राममारुती रस्ता या भागातही लक्ष्मीपूजनच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. मोठय़ा आवाजांच्या फटाक्यांची संख्या घटली असली तरी हे फटाके वाजवणे मात्र अद्याप बंद झाले नसल्याचे डॉ. बेडेकर यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्य़ात १२५ डेसिबलपेक्षा मोठय़ा आवाजाचे फटाके वाजवणे व विक्रीस ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. तरीही ठाण्याच्या विविध भागांत मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांचे बार उडविले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी अनेक फटाके वाजवल्याने ही पातळी १२५ डेसिबलपेक्षाही अधिक होत असल्याची नोंद शहरामध्ये करण्यात आली आहे. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढू लागली असून या विषयावर मोठय़ा प्रमाणात जनजागृती होऊ लागली आहे. त्यामुळे यंदा मोठय़ा आवाजाचे फटाके वाजविण्याचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे. असे असताना काही मोजके तरुण आणि व्यापाऱ्यानी यंदाही सर्वसामान्यांच्या कानठळ्या बसविल्याचे दिसून आले.
डॉ. बेडेकर यांनी शहरातील घोडबंदर मेडोज, तलावपाळी, राममारुती पथ आणि गोखले रस्ता परिसरातील नोंदी घेतल्या. त्यामध्ये घोडबंदर येथे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा आवाज सुमारे १२५ ते १३० डेसिबलपर्यंत पोहोचला होता. राममारुती रोड आणि गोखले रोडवरील व्यापाऱ्यांकडून फटाके वाजवल्याने या भागातील आवाज १२० डेसिबलपर्यंत होता. तर तलावपाळी परिसरातील टेंभीनाका वाहतूक आणि फटाके
यामुळे येथील आवाजही १०० डेसिबलपेक्षा जास्त होता. विशेष म्हणजे हा आवाज रात्री १२ वाजेपर्यंत सुरूच होता.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण घटले..
शालेय स्तरावर होणाऱ्या जागृतीमुळे मुले फटाके खरेदी करण्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. फटाके वाजवणाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांपेक्षा तरुण आणि व्यापारी मंडळींचा सहभाग जास्त असल्याचे निरीक्षण बेडेकर यांनी व्यक्त केले आहे.
ध्वनी आणि वायुप्रदूषणही वाढतेय
ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी विना आवाजाचे फटाके वाजवले जात असले तरी अशा फटाक्यांमुळे वायुप्रदूषण होत आहे. त्यामुळे फटाक्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.  शासकीय स्तरावरून अशा प्रदूषणकारी फटाक्यांच्या निर्मितीवर बंदी येण्याची गरज आहे. तरच हे प्रदूषण टाळता येईल, असे बेडेकर यांनी म्हटले आहे.