News Flash

पहिल्या दिवशी स्वस्तात गारेगार प्रवास

अनेकांनी केवळ गारेगार प्रवासाची अनुभूती घेण्यासाठी ठाण्यापर्यंत लोकल प्रवास केला.

ट्रान्सहार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलसेवेला प्रारंभ; साध्या तिकिटावर प्रवासाची मौज

ठाणे/ नवी मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकलसेवेचा गुरुवारपासून शुभारंभ करण्यात आला. पनवेल स्थानकातून दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी निघालेल्या या लोकलमधून प्रवास करण्यासाठी दुपारी एक वाजल्यापासूनच प्रवाशांची गर्दी झाली होती.

रेल्वेमंत्र्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवताच उत्साही प्रवाशांनी भरलेली ही ‘गारेगार’ गाडी ठाण्याच्या दिशेने रवाना झाली. विशेष म्हणजे, या गाडीचा पहिलाच दिवस असल्याने अनेक प्रवासी अजाणतेपणी तर काहींनी मुद्दामहून सर्वसाधारण लोकल तिकिटावरच एसी लोकलच्या प्रवासाचा अनुभव घेतला. अर्थात या लोकलचे तिकीटदर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने शुक्रवारपासून तिला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दोन वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिल्यांदा वातानुकूलित लोकल सुरू झाली. तेव्हापासूनच ती मध्य रेल्वेमार्गावर कधी धावणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे तिची मध्य रेल्वेवरील धाव रखडली होती. अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे-पनवेल- वाशी या ट्रान्सहार्बर मार्गावरून ही लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी नवी दिल्लीतून आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रेल्वे राज्यमंत्र्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे या लोकलला हिरवा झेंडा दाखवला. ही लोकल पाहण्यासाठी पनवेल स्थानकातील फलाट प्रवाशांनी फुलून गेले होते.

तर यातील अनेकांनी केवळ गारेगार प्रवासाची अनुभूती घेण्यासाठी ठाण्यापर्यंत लोकल प्रवास केला. गाडीच्या आतमध्येही प्रवाशांमध्ये उत्साह दिसत होता. चकचकीत लोकल, सुटसुटीत आसनव्यवस्था आणि संपूर्णपणे पारदर्शक काचेच्या खिडक्या यांमुळे सुखावलेले प्रवासी मोबाइलवरून सेल्फी काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात मग्न दिसत होते.

ठाणे स्थानकात फलाट क्रमांक १० वर रेल्वे आल्यावर एरव्ही जुनी लोकल पाहण्याची सवय असल्याने ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशी या वातानुकूलित लोकलकडे पाहून अचंबित झाले होते. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ही लोकल घेऊन आलेल्या मोटरमन आणि रेल्वे गार्ड तसेच उपस्थित इतर रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर राजन विचारे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही लोकल पुन्हा ठाणे स्थानकातून ५ वाजताच्या सुमारास पनवेल स्थानकाच्या दिशेने रवाना झाली. वातानूकुलित लोकलसाठी वेगळे तिकीट दर आकारले जात असल्याविषयीची कल्पना पनवेलच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नव्हती. सामान्य दरातले तिकीटच वातानुकूलित लोकलसाठी चालते असा समज स्थानकातील अनेक प्रवाशांमध्ये झाला. यामध्ये सर्वसाधारण लोकलचे दर असणाऱ्या मासिक पासधारकांचाही समावेश होता. दरम्यान या सर्व प्रवाशांनी वातानुकूलित लोकल सेवेचा पहिलाच दिवस असल्याने ‘चालून जाते’ म्हणत या वातानुकूलित लोकलमध्ये बसून गारेगार प्रवासाचा आनंद लुटला.

मी पनवेल येथे महाविद्यलयात शिकत असून मुंबई राहते,मात्र   वातानुकूलित लोकल मधून प्रवास करण्याची उत्सुकता होती,त्यामुळे मी सीएसटी लोकल सोडून ठाणे वातानुकूलित लोकलने प्रवास करीत आहे. -करुणा कणसे, प्रवाशी

पहिल्यांदा वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याची इच्छा होती, या एसी लोकलने रोजच्या लोकल पेक्षा वेगळा अनुभव घेता आला. – दयानंद कुलकर्णी, प्रवाशी

मनिषा म्हस्के सारथी :- मध्य रेल्वेवरील या पहिल्या वातानुकूलित लोकलचे सारथ्य करण्याचा मान महिला मोटरमन मनिषा म्हस्के-घोरपडे यांना मिळाला. केबिनमध्ये चढण्यापूर्वी मनिषा म्हस्के यांनी गाडीला वंदन केले. ‘गेल्या १५ वर्षांपासून मी रेल्वे विभागात कार्यरत आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील पहिली एसी लोकल चालवण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:11 am

Web Title: first day discount cooling ac railway travelling akp 94
Next Stories
1 कर विभागात शुकशुकाट
2 परिवहनच्या अपात्र बसवर बडगा
3 अर्नाळय़ात बालकावर श्वानांचा हल्ला
Just Now!
X