शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत शाळेत जरूर अनोख्या पद्धतीने करा, परंतु वरील बाबींचीही पूर्तता करा. सर्वच शाळांमधील असलेल्या शिक्षकांची गुणवत्ता तपासणेही तितकेच आवश्यक आहे. भरमसाट देणगी घेणाऱ्या शाळांनाही चपराक बसणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेने विचार करावा. त्याचप्रमाणे मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निश्चितच बदल अपेक्षित आहे.

दी ड महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारी शाळांतून पुन्हा किलबिलाट सुरू होणार आहे. शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी व पालकांसाठीही नवा असतो. नव्या गणवेशासारखे सारे काही नवेच असते. शाळा तीच, पण ती पुन्हानव्या इयत्तेच्या रूपाने विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा देत असते. काही शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र सर्वच शाळा नियमितपणे म्हणजेच १५ जूनला गजबजणार आहेत. गेल्या आठवडय़ापासून ठाण्यातील सर्वच दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे ती म्हणजे, शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी. रेनकोट, छत्र्यांच्या दुकानांतही गर्दी दिसून येते. मुलांच्या उत्साहाप्रमाणेच विक्रेत्यांच्याही उत्साहाला उधाण आले आहे. वस्तू त्याच, परंतु त्या नव्या नव्या स्वरूपात बाजारपेठेत दिसू लागल्या आहेत. एकंदरीतच शाळेचा पहिला दिवस हा जसा मुलांसाठी नवा असतो, तसाच तो पालकांसाठीही असतो.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत फुलांनी, सांस्कृातिक कार्यक्रमाने करा, अशी घोषणा केली आहे. जेणेकरून मुलांना त्यातून वेगळा आनंद मिळेल व शाळेबद्दल एक आपुलकी निर्माण होईल हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र ही घोषणा किती शाळांमध्ये अमलात येईल हे सोमवारी पाहायला मिळेल. मात्र हे करताना मुलांना देण्यात येणारा पोषण आहार चांगल्या दर्जाचा मिळावा याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. काही शाळांमध्येत विशेषत: मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये बालशिक्षण पद्धती अमलात आणण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये मुलांशी संवाद कशा पद्धतीने साधावा, तसेच पूर्वीपेक्षा शिकवण्याच्या पद्धतींमध्येही सकारात्मक बदल झालेला दिसून येतो. हा बदल पालकांना जाणवत असतो. म्हणजेच पाढे म्हणण्याची पद्धत, आकडेमोड, बेरीज, वजाबाकी मांडणे हे बदल जसे मुलांना शाळेत सांगितले जातात, त्याचप्रमाणे ते पालक सभेच्या वेळी किंवा शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांना सांगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनुदानित शाळा, पालिकेच्या शाळा या शाळांमधून विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र या सर्व वस्तू जर शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच निकालाच्या दिवशी दिल्या तर पहिल्या दिवशी शाळेत जाताना मुलांच्या आनंदात आणखीनच भर पडेल. शिक्षणमंत्र्यांनी दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेच परीक्षा देता येईल, हा निर्णय जाहीर केला; जेणेकरून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. बदलत्या काळाबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांसाठी बदल आवश्यक आहेत.
विद्यार्थ्यांसाठी शाळा जरी सोमवारी सुरू होणार असली तरी शिक्षकांसाठी ती १ जूनपासूनच सुरू झाली आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत सर्वच शाळांचे इन्स्पेक्शन होणे गरजेचे आहे. शाळेतील स्वच्छतागृहे, बाके आदी गोष्टींची पाहणी होणे आवश्यक आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्यासाठी शिक्षक तसेच व्यवस्थापनानेही सुरुवातीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत शाळेत जरूर अनोख्या पद्धतीने करा, परंतु वरील बाबींचीही पूर्तता करा. सर्वच शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांची गुणवत्ता तपासणेही तितकेच आवश्यक आहे. भरमसाट डोनेशन घेणाऱ्या शाळांनाही चपराक बसणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेने विचार करावा. त्याचप्रमाणे मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निश्चितच बदल अपेक्षित आहे.
एकूणच शाळेचा पहिला दिवस हा सर्वाच्या दृष्टीने एका नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवात करून देणारा असतो. गेला दीड महिना सुट्टी मजेत घालविलेले विद्यार्थीही या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहेत.