‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीत विविध विषयांना हात

नक्षलवाद.. राजकारण्यांचा उपद्रव.. एड्सचा विळखा.. तृतियपंथीयांचा आक्रोश.. ज्येष्ठ नागरिकांची समस्या आणि समाजातील सद्य:स्थितीवर प्रतिक्रिया देताना गांधीवादी विचारांच्या नागरिकांची होणारी मानसिक घालमेल अशा वेगवेगळ्या सामाजिक विचारांच्या विषयांवर आधारित एकांकिकांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाण्यातील प्राथमिक फेरीत रंग भरले. ज्ञानसाधना विद्यानिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या प्राथमिक फेरीतून तरुण कलावंतांच्या अभिनयगुणांचे दर्शन घडलेच; पण त्याबरोबरच समाजातील विविध विषयांबाबतच्या त्यांच्या जाणिवा किती संवेदनक्षम आहेत, याचेही प्रत्यंतर आले.

मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या ‘लोकांकिका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा उत्साह उत्तरोत्तर वाढत होता. एकाहून एक वेगळे विषय.. सहजसुंदर अभिनय.. नेत्रदीपक नेपथ्य.. जोशपूर्ण सादरीकरण, नावीन्यपूर्ण मांडणी आणि या सगळ्याला नृत्य, संगीत आणि गाण्यांची जोड यामुळे ‘लोकसत्ता लोकांकिके’ची प्राथमिक फेरीही एका वेगळ्या उंचीवर पोहचली होती. दिवसभर विविध महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांचे मोठे जथे विद्यानिकेतनच्या परिसरात दाखल होत होते. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी’ अशा घोषणाही या तरुणांकडून दिल्या जात होत्या. आपल्यातील उत्स्फूर्त आणि अभिजात नाटय़कलेचे दर्शन घडवण्यासाठी या तरुणांचा उत्साह सळसळत होता. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील महाविद्यालयांबरोबरच रायगड, पनवेल, विरार, सरळगाव, वांगणी, कळंबोली, नेरूळ अशा विविध भागांतील महाविद्यालये या स्पर्धेत उतरले होते. त्यांनी केलेल्या कलाविष्कारांनी उपस्थित स्पर्धक आणि प्रेक्षकांनी चांगली दाद दिली.

अवघ्या मोजक्या कलाकारांचा सहभाग असलेल्या एकांकिकेपासून अवघा रंगमंच व्यापून सोडणाऱ्या ५० ते ६० कलाकारांनिशी सादर झालेल्या एकांकिकांपर्यंत, प्रत्येक एकांकिका उपस्थितांना वेगळी अनुभूती देत होती. उत्स्फूर्ततेने भारावलेले वातावरण, जिंकण्याची ऊर्मी घेऊन स्पर्धेसाठी उतरलेले तरुण आणि त्यांना प्रोत्साहन देणारे प्रेक्षक आणि सहस्पर्धक असे दुर्मीळ चित्र या वेळी इथे दिसून येत होते. भारदस्त सादरीकरणाच्या जोरावर अनेकांनी ही स्पर्धा लक्षवेधी ठरवली.

नक्षलवादी विचारांच्या तरुणाचे हृदयपरिवर्तन झाल्यानंतर त्याचे जिवन ‘मित्त’ या ‘लोकांकिके’च्या माध्यमातून सादर करण्यात आले. पत्रकार मित्रासह नक्षलवादी परिसरामध्ये वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांची नक्षलवादी महिलेकडून झालेले अपहरण आणि याच नक्षलवादी चळवळीतून बाजूला झालेल्या एका समान्य व्यक्तीने त्यांची केलेली सुटका हा ‘मित्त’ची कथा असून अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या कलाकारांनी केला. सरळगावच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गंजार्डे’ या एकांकिकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी मृत्यूनंतर भुतांमध्ये कोणतेच फरक नसतात. राजकारणी आणि सामान्य व्यक्तीची भुते ही सारखीच असतात आणि मृत्यूनंतर आपल्या अन्यायाचा बदलाही घेतात. हे या एकांकिकेतून विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. तर कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एड्सग्रस्त तरुणाची आणि त्यांच्यातील भाविश्वाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. ‘क्षणभंगुर’ आयुष्याचा वेध या महाविद्यालयाने घेतला. तर आनंद विश्वगुरुकुल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘गांधी बात’ या एकांकिकेतून सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थिती उलगडून गांधीवादी विचारांच्या व्यक्तीची होणारी घालमेल दाखवून दिली.

परीक्षकांच्या प्रतिक्रिया

तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘लोकसत्ता लोकांकिके’ला मिळाला. मुंबईपल्याडच्या विभागातील महाविद्यालयेही आता मुंबईसोबत स्पर्धा करत आहे. ‘लोकसत्ता’ने त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले हे स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह हवाहवासा वाटणारा आहे. – रवींद्र लाखे

अभिनय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा उत्तम पर्याय आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव मिळतो. वेगवेगळ्या भागांतून वेगवेगळे विषय, आशयांसह विद्यार्थी या स्पर्धेत उतरलेले पाहून आनंद झाला. नाटकांविषयी तरुणांमधील उत्सुकता, उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
– नीलकंठ कदम

या स्पर्धेमुळे तरुणांसाठी एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.  एकांकिका स्पर्धेमुळे तरुणांना मराठी भाषा जाणण्याची संधी मिळते. आजपर्यंत ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या माध्यमातून केवळ महाविद्यालयांना संधी मिळत गेल्या, परंतु नाटय़क्षेत्रातील इतर संस्थांनाही या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येऊन ही स्पर्धा खुली करावी.
– सचिन गद्रे

लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. अशा दर्जेदार स्पर्धेमधून नक्कीच चांगले कलाकार तयार होतील याची खात्री वाटते.                – मिलिंद सफई, अभिनेते

लोकसत्ताचे आभार..

‘लोकसत्ताने लोकांकिके’च्या माध्यमातून आम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी आहोत. ‘मित्तर’ या एकांकिकेच्या माध्यमातून एका नक्षलवादी महिलेची भूमिका साकार करण्याची संधी मिळाली.
-पूजा कांबळे, ज्ञानसाधना महाविद्यालय

 

रंगभूमीवर पहिले पाऊल..

या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच अभिनय करण्याची संधी मिळाली. एकांकिका सादर करण्याची आमच्या महाविद्यालयाची ही पहिलीच वेळ आहे. लोकसत्ता लोकांकिकेच्या माध्यमातून आम्ही रंगभूमीवरती पहिले पाऊल टाकले आहे. अजून आम्हाला खूप शिकायचे आहे. दिग्दर्शक प्रशांत विचारे यांच्यामुळे अवघ्या चार ते पाच दिवसांत आम्ही तालीम करून ही एकांकिका सादर केली.
-मयूरेश कांबळे, आनंद विश्व गुरुकु ल, ठाणे.

हे व्यासपीठ महत्त्वाचे ..

लोकसत्ता लोकांकिकाच्या माध्यमातूनच आम्ही नाटय़क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. पहिलीच वेळ असल्याने सुरुवातीला काही चुका होतील का असे वाटले. परंतु सादरीकरणाच्या वेळेस मात्र मनावर काहीही दडपण आले नाही. या स्पर्धेपासूनच आमच्या एका वेगळ्या दिशेला वाटचाल सुरू झाली आहे. आमचे मुख्याध्यापक एस.एन.शेट्टी व शिक्षिका फातिमा खान यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. स्पर्धेतील माझ्या भूमिकेसोबतच चेतन काळे, हेमंत कांबळे, जयदीप भेलके यांचीही भूमिका चांगली रंगली आणि त्याचे कौतुक झाले. हे व्यासपीठच आमचा पुरस्कार असून आम्ही तोजिंकलो असल्याची भावना या स्पर्धेत भाग घेतल्याने मिळाली.
-वैष्णवी ठुबे, के.एल.ई. महाविद्यालय, कळंबोली.