26 September 2020

News Flash

चिंबोऱ्या, मुठय़ांमुळे मत्स्यखवय्यांची मज्जा!

पावसाची मस्त रिमझिम सुरूआहे. त्यात चिंबोरी-मुठय़ांचा झणझणीत रस्सा सोबतीला तांदळाची भाकरी जेवणाची लज्जत काही औरच वाढवते.

| June 23, 2015 06:03 am

पावसाची मस्त रिमझिम सुरूआहे. त्यात चिंबोरी-मुठय़ांचा झणझणीत रस्सा सोबतीला तांदळाची भाकरी जेवणाची लज्जत काही औरच वाढवते. पावसाचे आगमन झाले की खवय्यांना वेध लागतात ते डोंगरकपाऱ्यात रानमाळावर मिळणाऱ्या मुठय़ांचे. बाजारात काळ्या चिंबोऱ्या व मुठेही झाले असून खवय्यांनी त्यांच्यावर ताव मारायला सुरुवात केल्याचे बाजारातील गर्दीवरून दिसून येते. बाजारात काळी चिंबोरी डझनाला ३०० रुपये तर पिवळी चिंबोरी २५० रुपये डझन विकली जात आहे. मुठेही ५० ते ६० रुपये वाटय़ावर (प्रति वाटा पाच ते सहा नग) विकले जात आहे.
पावसाळ्यात मासे कमी प्रमाणात बाजारात येतात. त्यामुळे खवय्यांना जेवण बेचव वाटू लागते. मात्र सुक्या मासळीबरोबरच त्यांच्या जेवणाची लज्जत वाढविण्याचे काम हे पहिल्या पावसात मिळणारे मुठे तसेच चिंबोऱ्या भागवतात. हाडांच्या मजबुतीसाठी चांगले असणारे हे खेकडे खाण्यासाठी खवय्यांनी महागाईला न जुमानता बाजारात गर्दी केलेली दिसते. यंदा पावसाने चांगली सुरुवात केल्याने मुबलक प्रमाणात खेकडे उपलब्ध झाले आहेत. डोंबिवली, कल्याण, ठाकुर्ली येथील मासळी बाजारात काळे पिवळे मुठे व चिंबोरी जातीतील खेकडे दाखल झाले आहेत. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकालगत तर ठाकुर्ली येथे पूर्वेला खंबाळपाडा मराठी शाळेच्या बाजूला हा खेकडे विक्रीचा बाजार भरतो.
कातळ, चिंध्याची वाडी, वाघवाडी, कापरवाडी, कोपर खंड, कर्जत, कसारा,वाडा, कल्याणच्या आजूबाजूचा परिसर आदी ग्रामीण भागातील आदिवासी महिला येथे मोठय़ा प्रमाणात खेकडे विक्रीसाठी आणतात. खेकडय़ांच्या विविध जाती, आकार आणि दर्जानुसार त्यांची किंमत ठरते. दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत या महिला आपल्या टोपल्यांमध्ये चिंबोरी व मुठे घेऊन विक्रीसाठी बसतात. कल्याण, डोंबिवली येथील खाडीकिनारीही खेकडय़ांची पैदास मोठय़ा प्रमाणात होते. एक गोणी खेकडे सापडले तरी खूप चांगला धंदा होत असल्याचे या विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
रानखेकडे हे रात्रीच्या वेळीच व पाऊस सुरू असतानाच बिळाबाहेर येत असल्याने ते पकडण्यासाठी आदिवासींना रात्रभर फिरावे लागते. अशा वेळी साप, विंचू चावण्याची भीतीही असते. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी  हे काम करावे लागत असल्याचे पार्वती या आदिवासी महिलेने सांगितले.

खेकडय़ांचे दर
पिवळे मुठे
५० ते ६० रुपये डझन
लाल मुठे
१०० रुपये डझन
पिवळी चिंबोरी
२५० रुपये डझन
काळी चिंबोरी
३०० रुपये डझन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 6:03 am

Web Title: fish in short supply amid monsoon season
Next Stories
1 स्वच्छतागृह उभारणीतही ठेकेदाराची सोय
2 ठाण्यात ठिकठिकाणी ‘बायो स्वच्छतागृहे’
3 ठाणे शहरबात : रस्त्यावरचा बाजार खरेच उठणार?
Just Now!
X