व्यापारी भाव पाडत असल्याचा आरोप; किमतीत १० ते १२ टक्क्यांनी घट

पावसाळ्यात मासेमारी बंदीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता कुठे वसईतील मच्छीमारांच्या जाळ्यात मासे सापडले आहेत, मात्र व्यापाऱ्यांकडून कमी किंमत मिळत असल्याने पापलेटचे भाव गडगडले आहेत. तब्बल १० ते १२ टक्क्यांनी पापलेटच्या किमती कमी झाल्याचे मच्छीमार संघटनांकडून सांगण्यात येत आहे.

वसईमध्ये पाचूबंदर आणि नायगाव येथे दोन मुख्य बाजार रात्रीच्या वेळी भरतो. यामध्ये मच्छीमारांनी पकडलेल्या माशांचा लिलाव केला जातो. या ठिकाणांहून वसईतील सर्व हॉटेल व्यावसायिक, मच्छीविक्रेते, व्यापारी मासळी विकत घेतात. मुख्यत: पापलेटला सर्वात जास्त मागणी असते आणि त्यामधूनच लाखोंची उलाढाल वसईत होत असते. यामध्ये लहान पापलेट, सुपर पापलेट म्हणजेच मोठे पापलेट हे मुख्यत: प्रकार असतात. परंतु सध्या याच्या किमती या कमी झाल्याने मच्छीमारांचे नुकसान होत आहे.

गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या किमती साधारणत: १० ते १५ टक्क्याने कमी झाल्या आहेत. परंतु सुरमई, कोळंबी, बांगडे, हलवा, घोळ, वाव, पाकट, रावस, मुशी, खरपालू, शिंगाडा असे विविध मासे येथे थेट लिलावासाठी येत आहेत. मात्र त्यांच्या किमती गेल्या वर्षी इतक्याच असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.

वसई किनारपट्टीतल्या २० ते २५  गावांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. येथील शेकडो कुटुंबे मासेमारी हाच व्यावसाय करतात. मच्छीमारीच्या एका फेरीसाठी  ४० ते ५० हजार खर्च  करून जावे लागते, तसेच बोटीवर काम करणाऱ्या खलाशांसाठी पैसेही मोजावे लागतात. त्यातच दिवसेंदिवस कमी होत चाललेली मासळी, त्यातून कमी झालेले उत्पन्न, उत्पन्न कमी म्हणून डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा वाढतच चालला असताना या नवीन संकटाला आता सामोरे जावे लागत आहे.

स्वस्ताईची कारणे..

वाशी, गुजरात भागांतील निर्यातदार आणि व्यापारी मच्छीमारांचा माल कमी किमतीमध्ये विकत घेतात. त्यामुळे पापटलेच्या किमती कमी झाल्याचे वसईतील कोळी युवा शक्तीचे दिलीप माठक यांनी सांगितले.