25 February 2021

News Flash

पावसाळय़ापूर्वीच मासे महाग!

मुंबईत होणारी आवक घटल्याने त्याचा फटका ठाणे, डोंबिवली परिसरात दिसून येत आहे.

आवक रोडावल्याने दरांत दुप्पट वाढ

दरवर्षी जून महिन्यात मासेमारी बंद झाल्यानंतर मासळी महागतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. यंदा मात्र, उन्हाळय़ातच मासळीची आवक घटू लागली असून सहा महिन्यांच्या तुलनेत मासे दीडपट महाग झाल्याचे चित्र आहे. सहा महिन्यांपूर्वी ५०० ते ६०० रुपयांना मिळणारी मोठय़ा पापलेटची जोडी सध्या एक हजार रुपयांपासून पुढे किमतीला विकली जात आहे.

हवामानात सातत्याने होणारे बदल आणि हवेतील आद्र्रतेत झालेली वाढ यामुळे माशांची पैदास कमी होत असल्याचा दावा मच्छीमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मासे जाळय़ात सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच पंधरवडय़ापासून समुद्र खवळलेला असल्याने मासे गळाला लागत नाही. समुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी, बोटींतून होणारी तेलगळती यांमुळे होणाऱ्या सागरी प्रदूषणाचाही माशांच्या पैदासवर परिणाम झाला आहे, असा दावा उरण मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष जयविंद कोळी यांनी केला.

मुंबईत होणारी आवक घटल्याने त्याचा फटका ठाणे, डोंबिवली परिसरात दिसून येत आहे. मे महिन्यात कोकण किनारपट्टी येथील पर्यटन वाढलेले असते. त्यामुळे तेथे माशांची मागणी अधिक आहे. मुंबई बंदर हे बोंबील माशासाठी प्रसिद्ध आहे. या बंदरावर बोंबील माशाची आवक जास्त असून दिवसाला १०-१५ टन आवक होत आहे.  तर पापलेट, सुरमई या माशांची आवक कमालीची घटली आहे, अशी माहिती ठाण्यातील मासळी विक्रेत्या भारती कोळी यांनी दिली. कमी आवक असल्याने एक किलोचे पापलेट किंवा सुरमई १५०० ते १६०० रुपयांना विकली जात आहे. अधिक ताजे पापलेट दोन हजार रुपयांपर्यंत विकले जात असल्याचे त्या म्हणाल्या.
fish1

कोळी महोत्सव लांबणीवर

मासळी महागल्यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंचातर्फे मे महिन्यात होणारा कोळी महोत्सव पुढे ढकलण्यात आला असून आता तो ऑक्टोबर माहिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती कलामंचाचे सदस्य प्रल्हाद नाखवा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:55 am

Web Title: fish price hike
Next Stories
1 जलवाहिन्यांतील पाणीगळती रोखणार
2 ठाण्यातील गृहसंकुलात ‘शून्य कचरा’ मोहीम
3 खाडीला जोडणाऱ्या नाल्यांचे रुंदीकरण करा
Just Now!
X