05 June 2020

News Flash

मासळीच्या दरात १०० ते १४० रुपयांची वाढ

मासे विक्रीच्या व्यवसायापुढे आर्थिक संकट

दरवाढीमुळे खरेदीकडे ग्राहकांची पाठ; मासे विक्रीच्या व्यवसायापुढे आर्थिक संकट

ठाणे : करोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी देशभरात टाळेबंदी करण्यात आली असून त्याचा फटका विविध उद्योगांसह आता मत्स्योद्योगालाही बसला आहे. मोठय़ा बोटींच्या माध्यमातून होणारी मासेमारी बंद असून आता छोटय़ा बोटीतून मासेमारी केली जात आहे. त्यामुळे माशांची आवक ९० टक्क्य़ांनी घटली असून यामुळे ठाणे तसेच आसपासच्या शहरात मासे दरात १०० ते १४० रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे अनेकांनी मासे खरेदीकडे पाठ फिरविल्याने मासे विक्रीच्या व्यवसायापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

ठाणे जिल्ह्यात कुलाबा आणि भाऊचा धक्का येथून मोठय़ा प्रमाणात माशांची आवक होते. मात्र, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशात टाळेबंदी लागू केली आहे. तसेच पाचपेक्षा अधिक जणांना एकाच ठिकाणी जमा होण्यास मज्जाव केला आहे. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विविध उद्योगांप्रमाणेच मासेमारीच्या व्यवसायालाही फटका बसला आहे. सद्य:स्थितीत मोठय़ा बोटींच्या माध्यमातून मासेमारी बंद आहे. त्यामुळे छोटय़ा बोटींच्या माध्यमातून मासेमारी केली जात आहे. असे असले तरी अनेकांनी करोनाच्या भीतीने अशा पद्धतीने मासेमारी करणे बंद ठेवले आहे. त्यामुळे छोटय़ा बोटींच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. छोटय़ा बोटीमधून मासेमारी करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून या बोटींसाठी पुरेशा प्रमाणात डिझेल आणि बर्फ उपलब्ध होत नसून त्यामुळेही अनेकांना बोटी बंद ठेवाव्या लागत आहेत. या कारणास्तव माशांची आवक ९० टक्क्य़ांनी घटली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच आसपासच्या शहरांमध्ये माशांची आवक घटली असून या कारणास्तव मासे दरात १०० ते १४० रुपयांनी वाढ झाली आहे. टाळेबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होईल असे शासनाकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजीपाला, चिकन आणि मटणासह माशांचा पुरेसा पुरवठा होणे गरजेचे असून या पार्श्वभूमीवर प्रत्येक बंदरात बर्फ, डिझेल आणण्यास तसेच बाजारात मासे घेऊन जाण्यास रीतसर परवानगीचे लेखी निर्देश शासनाने द्यावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यास त्यांनी मान्यता दिल्याने आवक वाढण्याची शक्यता तांडेल यांनी वर्तवली आहे. असे असले तरी माशांची आवक वाढत नसल्याचा दावा विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

मासळीचा दर (किलोप्रमाणे)

मासे    पूर्वी    आता

पापलेट  ६००    १०००

सुरमयी ६००    ८००

रावस   ६००    ८००

कोळंबी  ४००    ८००

बोंबील  २००    ५००

टाळेबंदीमुळे बाजारात पुरेशा प्रमाणात मासे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक मासळी बाजार बंद ठेवावे लागत आहेत. ज्या ठिकाणी मासळी आवक झाली, तीसुद्धा पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे माशांच्या दरात वाढ झाली आहे. आवक अशीच राहिली तर त्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

– सुरेंद्र पाटील, मासळी विक्रेता, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 3:22 am

Web Title: fish rates increased by rs 100 to 140 zws 70
Next Stories
1 जिल्हा रुग्णालय आता करोनाबाधितांसाठी राखीव
2 शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासाचे धडे
3 ठाणे शहरातील ध्वनी प्रदूषण घटले
Just Now!
X