कोळीवाडे नष्ट होण्याची मच्छीमारांना भीती

एमएमआरडीएच्या आराखडय़ात प्रस्तावित करण्यात आलेल्या सागरी महामार्गाने (कोस्टल रोड) प्रवास सुखकर होणार असला तरी मच्छीमारांना तो उद्ध्वस्त करणार असल्याचा मच्छीमारांचा आरोप आहे. सीआरझेडमध्ये असलेल्या मच्छीमारांच्या पारंपरिक जागा शासन काढून घेणार असल्याची भीती आहे. वसईजवळ भराव होणार असल्याने कोळीवाडे पाण्यात जाण्याची धोका निर्माण झाला आहे. सर्वात जास्त फटका उत्तन गोराईच्या मच्छीमारांना बसणार आहे

उत्तनजवळ धारावी नावाचे बेट आहे. मनोरी, गोराई, उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी अशी गावे तिथे आहेत. ४०० वर्षांपासून मच्छीमारांच्या वसाहती तेथे आहेत. सध्या कोळीवाडय़ातून समुद्रात जाण्यासाठी पाच-सहा फुटांचे छोटे रस्ते किंवा पायवाट आहे. सागरी महामार्ग आला की तेथे ६० फुटांचे प्रशस्त रस्ते होणार आहे. हे भले मोठे रस्ते आम्हाला उद्ध्वस्त करणारे ठरतील, असे उत्तन येथील सामाजिक कार्यकर्ते नेविल डिसोजा यांनी सांगितले. विकास नक्की करावा, पण आम्हाला विश्वासात का घेतले नाही, आम्हाला काहीच कल्पना का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला. मच्छीमारांच्या नावाने जमिनी नाहीत, त्यांच्या नावाने घरे नाहीत. पारंपरिक जागेवर ते मासे आणणे, सुकवणे, जाळ्या विणणे आदी कामे करून आपले पोट भरीत असतात. उत्तन-गोराईचा पट्टा सीआरझेड क्षेत्रात येतो. तेथे ४ एफएसआय देण्यात आलेला आहे. याशिवाय रासायनिक कारखान्यांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. जेथे मच्छीमारांच्या नावाने घरे नाहीत, तेथे ४ एफएसआय म्हणजे क्रूर थट्टा असल्याचे डिसोजा यांनी सांगितले.

विकासाचा मार्ग बिल्डरांच्या जागेवर का नाही?

आम्ही विकासाच्या विरोधात आहोत, असे बोलले जात आहे. पण आम्हाला विस्थापित करून विकास कसा होणार, असे कोळी युवा संघटनेच्या दिलीप माठक यांनी सांगितले. आमच्या नावावर सातबारा उतारे करा, अशी मागणी मच्छीमार करतोय. पण आता आमच्याच दारात रस्ते काढून, सीआरझेड उठवून विविध योजना राबवल्या जात आहे. यामुळे आपसूकच आमचा हक्क निकालात काढण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. विकासाचे मार्ग, योजना नेहमी भूमिपुत्र, शेतकरी आणि मच्छीमारांच्याच जागेवर का असतो. कुणी बडय़ा बिल्डरांच्या जागेवर कधीच का नसतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

हा सागरी महामार्ग मुंबईहून उत्तनमार्गे विरार आणि पुढे जाणार आहे. नायगावच्या वडवली येथे त्यासाठी समुद्रात भराव टाकला जाणार आहे. यामुळे पाचूबंदर, किल्लाबंदर हे मोठे कोळीवाडे पाण्याखाली जाणार आहेत. मुंबईपासून सर्व कोळीवाडय़ांना भेदत हा सागरी महामार्ग जाणार आहे. सागरी महामार्ग ही इतरांना रम्य कल्पना वाटत असली तरी मच्छीमारांच्या अंगणाला चिरत तो जाणार आहे.

दिलीप माठक, अध्यक्ष कोळी युवाशक्ती

एमएमआरडीएचा आराखडा हा किनारपट्टीला धोकादायक आहे. सागरी महामार्ग आणि त्याला लागून असलेल्या विकास परवानग्या म्हणजे मोठय़ा प्रमाणावर नागरिकीकरण होणार आहे. आम्ही सर्वशक्तीनिशी याला विरोध करणार आहोत.

राजू तांडेल, अध्यक्ष, मच्छीमार स्वराज्य समिती