मालवाहू बोटीच्या धडकेने मच्छीमाराचा मृत्यू प्रकरण

केंद्र शासनाच्या प्रस्तावित मालवाहतूक जलमार्गाविरोधात (शिपिंग कॉरिडॉर) पालघर जिल्ह्य़ातील मच्छीमारांनी आपला लढा तीव्र केला आहे. रविवारी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू बोटीने मासेमारी करणाऱ्या नौकेला जोरदार ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात एका मच्छीमाराचा बळी गेला आहे. मालवाहू जहाजांसाठी शासनाने प्रस्तावित केलेल्या नव्या कॉरिडॉरमध्येच हा अपघात झाला आहे. मासेमारी नौकेचा हा अपघात म्हणजे या जलमार्गाचा पहिला बळी असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला असून याविरोधातील जोरदार लढा देणार असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘शिपिंग कॉरिडॉर’चा फटका मासेमारीला बसणार आहे, असा आरोप मच्छीमारांनी केला आहे. याविरोधात गेल्या एक महिन्यांपासून मच्छीमारांचा लढा सुरू आहे. सरकारने समुद्रात किनाऱ्यापासून पाच नॉटिकल मैल अंतरापासून पुढे मालवाहू जहाजांसाठी नवा कॉरिडॉर प्रस्तावित केला आहे. या नव्या कॉरिडॉरमुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याने तसेच मालवाहू जहाजांचा धोका मासेमारी नौकांना होणार असल्याने मच्छीमारांचा या कॉरिडॉरला तीव्र विरोध आहे. काही दिवसांपूर्वीच मच्छीमारांनी त्याविरोधात मुंबईत तीव्र निदर्शनेही केली होती.

यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच या कॉरिडॉरमध्ये मासेमारी नौकेचा अपघात झाला. प्रस्तावित कॉरिडॉरचा हा पहिला बळी आहे, असा आरोप मच्छीमारांचे नेते लिओ कोलासो यांनी केला आहे.

हा माहवाहतूक व्यापारी मार्ग रेटून नेण्याचा प्रयत्न शासनाने केला तर मच्छीमारांचे मासेमारी क्षेत्र असलेली ठिकाणे नष्ट होतील. मच्छीमार जिथे मासेमारी करतात, त्याच क्षेत्रात हा जलमार्ग प्रस्तावित आहे. देशाचा विकास म्हणून हा प्रकल्प लादू पाहिला तर याच देशाचा एका बाजूने विकास होईलच, पण याच देशाचे नागरिक असलेल्या लाखो मच्छीमारांना त्याचा मोठा फटका बसणार आहे, मच्छीमार कृती समितीकडून सांगण्यात आले. मॉर्निग स्टार या बोटीला सरकारमार्फत भरपाई मिळावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

तांडेलचा मृतदेह सापडला

मुंबई कोळीवाडय़ातील डॉमनिक बुध्या कोळी यांची मॉर्निग स्टार ही बोट ८० सागरी मैलांवर मासेमारी करत असताना रविवारी रात्री गुजराकडे जाणाऱ्या मालवाहून नौकेने (टग बोटी) तिला धडक दिली. यात बोटीचा तांडेल बबन पाल समुद्रात फेकला गेला. त्याचा मृतदेह अद्याप सापडला नव्हता. वसईहून २५ नॉटिकल मैल अंतरावर तटरक्षक दलांना बुधवारी रात्री त्याचा मृतदेह सापडला. या अपघातात मॉर्निग स्टारचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर मच्छीमारांमध्ये प्रस्तावित कॉरिडॉरबाबत भीतीचे वातावरण आहे.

केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला मालवाहतूक जलमार्ग रद्द करून सर्व मालवाहू जहाजांना १०० सागरी मैलांपलीकडे मार्ग देण्यात यावा, तसेच अपघातग्रस्त मच्छीमार कुटुंबाला नुकसानभरपाई देण्यात यावी.

– किरण कोळी, सरचिटणीस, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती.

व्यापारी मालवाहू जहाजांच्या स्वतंत्र मार्गिकेला देशभरातील मच्छीमारांकडून विरोध होत आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, दक्षिणबंग मत्स्यजीबी फोरम या सर्व संघटनांनी या मालवाहतूक मार्गाला तीव्र विरोध केला आहे. समुद्री मार्गामुळे मच्छीमार व्यवसायात अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील लाखो लोकांना याचा धोका आहे. त्यांच्या रोजगारावर याचा थेट परिणाम होणार आहे.

– लिओ कोलासो, अध्यक्ष, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती