केंद्र शासनाच्या व्यापारी जलमार्गाविरोधात देशभरातील मच्छीमार एकवटले असून ३० ऑक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मच्छीमारांची देशपातळीवरील संस्था नॅशनल फिशवर्कर फोरमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची गोव्यात ७ ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली. या व्यापारी जलमार्गामुळे मासेमारीला धोका निर्माण होईल, अशी भावना सर्वच प्रतिनिधींनी व्यक्त केली. बंदर विकासाच्या उद्देशाने सुरू केलेल्या सागरमाला प्रकल्पाला मच्छीमारांनी कडाडून विरोध केला.

या व्यापारी जलमार्गाला विरोध दर्शवण्यासाठी ३० ऑक्टोबर रोजी देशातील सर्व मच्छीमार बंद पाळणार असून वेगवेगळ्या प्रकारे विरोध करणार आहेत. पालघर, ठाणे, मुंबई व रायगडच्या सुमारे पाच हजार बोटी मुंबईतील जेएनपीटी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बंदरावर धडकून व्यापारी नौकाचा बंदरामध्ये प्रवेश रोखणार असल्याची माहिती नॅशनल फिशवर्कर फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबरीने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली.