तेल सर्वेक्षणामुळे मत्स्य व्यावसायिक नाराज; किमतीत २०० ते ३०० रुपयांची वाढ

कल्पेश भोईर, वसई

तेल सर्वेक्षणामुळे वसई परिसरातील समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आल्याने मासळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवक घटल्याने त्याचा परिणाम माशांच्या किमतीवर झाला असून मासळी महाग झाली आहे. काही माशांच्या किमती दुपटीने वाढल्याने मत्स्यखवय्यांना त्याचा फटका बसणार आहे.

वसई तालुक्यातील अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव आणि इतर भागांत मोठय़ा प्रमाणावर मासेमारीचा व्यवसाय केला जातो. मात्र ओएनजीसी कंपनीने या भागात तेल सर्वेक्षण सुरू केल्याने मासेमारी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे बाजारात कमी मासळी उपलब्ध झाली आहे.

हिवाळ्यात मासळीची मागणी मोठय़ा प्रमाणात असते, मात्र या वेळी या माशांची आवक घटली आहे. त्यामुळे माशांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. जे किरकोळ विक्रेते बाजारात विकण्यासाठी मासळी खरेदी करतात त्यांनाही चढय़ा दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे बाजारातही मासळीचे भाव २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत.

मासेमारीसाठी येथील मच्छीमार समुद्रात खोलवर बोट घेऊन जातात. त्या ठिकाणी १५ दिवस, एक महिना अशी मासेमारी केली जाते. मात्र आता मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांना बोटी किनाऱ्यावरच लावून ठेवाव्या लागल्या आहेत. मासेमारीस ऑगस्ट महिन्यानंतर सुरुवात होत असते, तेव्हा मोठय़ा प्रमाणात मासे बाजारात येत असतात. मात्र तेल सर्वेक्षणामुळे आता मच्छीमारांच्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे, असे मच्छीमारांनी सांगितले.

यंदा पावसाळय़ात मच्छीमार वादळी वाऱ्यांमुळे संकटात सापडले होते. आता या बंदीमुळे त्यांना पुन्हा आर्थिक फटका बसला आहे. वसईतील नायगाव कोळीवाडा, अर्नाळा, पाचूबंदर व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो मच्छीमार मासेमारीचा व्यवसाय करतात. मासेमारी हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

माशांचे वाढलेले दर

मासे              आधीचे भाव     आताचे भाव

पापलेट वाटा    ५००-१०००      ७००- १२००

सूरमई              ५००- ८००      ७००- १०००

वाव                  ४००- ६००      ६००- १०००

बोंबिल  वाटा    १००-१५०       १५०-३००

हलवा              २००-३००       ३००-६००

ऐन मच्छीमारीच्या कालावधीत ओएनजीसीने सर्वेक्षण सुरू केल्याने मासेमारी बंद करावी लागली. त्यामुळे मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारातही मासळीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आता किरकोळ विक्रेत्यांना चढय़ा दराने मासळी खरेदी करावी लागत असल्याने मासे महाग झाले आहेत.

– विजय वैती, मच्छीमार व विक्रेता