X
X

मच्छीमार रिकाम्या हाती!

समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी करणे अशक्य

समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी करणे अशक्य

पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा काळ संपल्यानंतर पहिल्यांदाच मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना समुद्रात भरघोस मासळी मिळण्याची आशा होती, परंतु मच्छीमारांच्या या अपेक्षेवर अक्षरश: पाणी फिरले आहे. मच्छीमारांना मासे न पकडताच रिकाम्या हातांनी समुद्रकिनाऱ्यावर परतावे लागले आहे. समुद्र अद्याप खवळलेल्या स्थितीतच असल्याने मासेमारी करणे अशक्य होऊन बसले असल्याने उत्तनसह वसई-विरार आणि मुंबईच्या बहुतांश मासेमारी नौका किनाऱ्यावर परतल्या आहेत. यात मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा काळ याआधी १५ ऑगस्टपर्यंत ठेवण्यात येत असे, परंतु गेल्या काही वर्षांपासून ही बंदी १ ऑगस्टपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही मासेमारी नौका १ ऑगस्टला मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाल्या, परंतु समुद्रात अद्यापी वादळी वातावरण कायम आहे. समुद्र जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत मच्छीमारांना समुद्रात जाळी लावणे शक्य होत नाही.

समुद्र अद्याप खवळलेलाच असल्याने मच्छीमारांना मासे पकडणे शक्य झाले नाही. समुद्र शांत होईल म्हणून मच्छीमारांनी काही दिवस वाट पाहिली, परंतु परिस्थितीत काहीच फरक न पडल्याने मासेमारी नौका रिकाम्या हातानेच परत किनाऱ्यावर फिरल्या आहेत. सध्या भाईंदरजवळील उत्तन आणि चौक बंदरात आणि वसई-विरारमधील बहुतेक किनाऱ्यांवर या मासेमारी नौका उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.

काही मोठय़ा मासेमारी नौका मात्र समुद्र शांत होण्याची वाट पाहात समुद्रातच नांगर टाकून उभ्या आहेत, परंतु ज्या मासेमारी नौकांना असे वाट पाहणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही त्यांनी परतीचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे पावसाळ्यातील बंदीनंतरच्या मासेमारीच्या पहिल्याच हंगामात मच्छीमारांना आर्थिक फटका बसला आहे.

आर्थिक नुकसान

मासेमारीच्या एका खेपेसाठी मच्छीमारांना मोठा खर्च असतो. नौकेला लागणारे डिझेल, कामगारांचा पगार, त्यांना लागणारे अन्नधान्य, मासे ठेवण्यासाठी लागणारा बर्फ यांसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येत असतो, परंतु या वेळी समुद्रात असलेल्या वादळी परिस्थितीमुळे हा खर्चही भरून काढणे शक्य झाले नसल्याने मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, अशी माहिती मच्छीमारांचे नेते जॉर्जी गोविंद यांनी दिली.

परंपरेप्रमाणे मासेमारी बांधव आपल्या मासेमारी नौका नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पाण्यात उतरवत होते. मात्र मत्स्यदुष्काळ आणि आणि वाढत्या महागाईमुळे नारळी पौर्णिमेच्या आधीच म्हणजे बंदी उठल्यानंतर लगेचच वसईतील मच्छीमार मासेमारीसाठी रवाना झाले. मात्र यंदाच्या मासेमारीबंदी नंतरच्या पहिल्याच हंगामामध्ये मच्छीमारांच्या हाती निराशा आली असून त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.    – राजू तांडेल, मच्छीमार

22
Just Now!
X