11 December 2017

News Flash

खाऊखुशाल : पारंपरिक मांसाहाराची लज्जत

या पारंपरिक पदार्थामध्ये मांसाहार असल्यास खऱ्या मांसाहार प्रेमींसाठी ही जेवणाची परिपूर्ण थाळी ठरू शकते.

किन्नरी जाधव | Updated: October 7, 2017 3:48 AM

भरलेली चिंबोरी, झणझणीत मटणाचा रस्सा, र्ती आलेले माशांचे कालवण अशा साग्रसंगीत मांसाहारी जेवणाची विविध्यता कुणाही मांसाहारप्रेमी खवय्यांसाठी कायमच पर्वणी ठरेल. आहारात वैविध्य हवेच असते पण, नेहमीच्या साचेबद्ध जेवणाच्या थाळीमध्ये एखादा तळलेला बोंबील, कोलंबीचे भुजणे असल्यास मांसाहाराला पारंपरिक चवीचा साज मिळतो. मोठमोठय़ा रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये चिकन टिक्का, चिकन मोगलाई असे जिभेला आणि पर्यायाने मनाला तृप्ती देणाऱ्या पदार्थाची रेलचेल असते. कधी तरी वेगळ्या चवीच्या आग्रहाने आपण अशा वैविध्य असलेल्या खाद्यपदार्थाच्या हॉटेलाकडे वळतो. मात्र ही चव कधी तरीच हवी असते. घरात बनवलेल्या पारंपरिक जेवणाच्या प्रेमात आपण अखंड असतो. या पारंपरिक पदार्थामध्ये मांसाहार असल्यास खऱ्या मांसाहार प्रेमींसाठी ही जेवणाची परिपूर्ण थाळी ठरू शकते. चोखंदळ खवय्ये अशा घरगुती पारंपरिक खाद्यपदार्थाच्या कायम शोधात असतात. काही तरी उत्तम मांसाहारी खाण्याची इच्छा होऊन अशा पदार्थाच्या शोधात खवय्यांनी बाहेर पडावे आणि या खवय्यांच्या वाटेत उत्तम मांसाहारी पदार्थाचे ठिकाण मिळावे हा खाद्यानंद वेगळाच. ठाण्यात चरई भागात काही महिन्यांपूर्वी सुरूझालेले ‘फिशोलिक्स’ खाद्यपदार्थाचे दुकान अनेक खवय्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मनीष प्रधान आणि रुपाली प्रधान या दाम्पत्याने ‘फिशोलिक्स’ उभारले आणि पारंपरिक मांसाहारी खाद्यपदार्थाची पर्वणी ठाण्यातील खवय्यांसाठी सुरू केली आहे.

नेहमीचा पाश्चिमात्य मांसाहार खाऊन कंटाळा आला असल्यास  येथील घरगुती पद्धतीचे माशांचे कालवण, चिकनचा रस्सा उत्तम पर्याय आहे. चिकन शोर्मा, चिकन कबाब खाण्यासाठी खवय्यांची नेहमीच गर्दी होत असते. या पाश्चिमात्य पदार्थासोबतच पारंपरिक घरगुती मसालेयुक्त मांसाहार खवय्यांना मिळावा या उद्देशातून ‘फिशोलिक्स’ची स्थापना करण्यात आली. पारंपरिक मांसाहारामध्येही वेगळेपण जपून जिभेचे चोचले पुरवणारे अनेक खाद्यपदार्थ या ठिकाणी बनवले जातात. कोलंबी कटलेट, खिमा कटलेट, मासे कटलेट, मटण ग्रेव्ही, मटण सुका, चिकन ग्रेव्ही, चिकन सुका अशा खाद्यपदार्थाची रेलचेल या ठिकाणी असते. फिशोलिक्समध्ये मिळणारी भरलेली कोंबडी या ठिकाणची विशेष खाद्यथाळी म्हणता येईल. बाजारात उपलब्ध असलेल्या पौष्टिक भाज्यांचे मिश्रण कोंबडीच्या पोटात भरण्यात येते. ही कोंबडी चुलीवर भाजल्यावर भाज्या आणि कोंबडी यांचा एकत्रित आस्वाद घेता येतो. खास सीकेपी पद्धतीने बनवण्यात येणारी फणसाच्या गऱ्यांची खीर शाकाहारी खवय्यांसाठी उत्तम आहे. काफा फणसाचे गरे उकडून दूध, साखर, रवा यांच्या मिश्रणातून ही खीर बनवण्यात येते. हल्ली नियमित फणसाचे गरे उपलब्ध होत असल्याने कधी फणसाच्या गऱ्यांची खीर खायची इच्छा झाल्यास फिशोलिक्समध्ये ही खीर मिळते. शाकाहारी जेवणातील अळूवडी सगळ्यांनाच प्रिय असते. मात्र या अळूवडीमध्ये नावीन्य आणून जवळा घातलेली अळूवडी, बोंबील अळूवडी, भेजावडी अशा नावीन्यपूर्ण पदार्थाची रेलचेल फिशोलिक्समध्ये पाहायला मिळते. खास दिवाळीच्या निमित्ताने खिमा पानीपुरी, खिमा मिसळ-पाव, खिमा वडापाव खवय्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

खिमा पाणी-पुरीचा स्वाद

फिशोलिक्समध्ये मिळणारी खिमा पाणी-पुरी येथील विशेष आकर्षण ठरते. पाणी-पुरीसाठी बनवण्यात येणाऱ्या आंबट-तिखट पाण्यात खिम्याचे सारण भिजवण्यात येते. हे सारण पाणी-पुरी खाताना पुरीमध्ये भरून खिमा पाणी-पुरी बनवण्यात येते. आंबट-गोडचवीसोबत खिम्याचा आस्वाद म्हणजे पाणी-पुरीप्रेमींसाठी काही तरी नवी चव अनुभवायला मिळते.

कोलंबीची खिचडी

खास सीकेपी पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या कोलंबीच्या खिचडीचा आस्वाद काही औरच. नारळाच्या दुधात ही कोलंबीची खिचडी बनवण्यात येत असल्याने उत्तम मासे खाणाऱ्या खवय्यांना या कोलंबीच्या खिचडीची चव अवर्णनीय आहे. नारळाच्या दुधात बनवलेल्या या कोलंबीच्या खिचडीवर तुपाची धार सोडून या खिचडीचा आस्वाद घेता येतो.

फिशोलिक्स

  • कुठे?- गौतमधारा, शॉप नं २, पवार इंडस्ट्रिअल इस्टेट, स्टेट बँक एटीएमजवळ, चरई, ठाणे (प).

First Published on October 7, 2017 3:48 am

Web Title: fisholics thane takeaway meal non veg food