tv55ठाणे शहर वाहतूक पोलीस खात्याने शहराच्या प्रमुख चौकात व रस्त्यांवर सीसी कॅमेरे बसवण्याची व त्याद्वारे वाहतुक नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची योजना तयार केली असून तिच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेस सादर केली असल्याची बातमी मध्यंतरी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाली होती. योजना कोटय़वधी रुपयांची म्हणजे मोठय़ा खर्चाची असल्याने साहजिकच सर्व संबंधितांना या योजनेच्या पूर्णतेत रस आहे. त्यामुळे त्याची पूर्तता होऊन शहरात रस्त्यारस्त्यांवर कॅमेरे लागणार त्याबद्दल ठाणेकरांच्या मनात संदेह नाही.
आज ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर प्रवेश बंद, एक दिशा मार्ग, नो पार्किंग, पी१, पी२, हे फलक लावलेले नाहीत. ज्या ठिकाणी आहेत तेही तुटलेल्या वा पुसलेल्या अवस्थेत आहेत. रस्त्यांवर पिवळ्या रंगाचे पार्किंग बॉक्स आखलेले नाहीत. परिणामी वाहनधारकांना चारचाकी/ दुचाकी रस्त्यांवर पार्किंग करण्यासाठी/ न करण्यासाठी कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही व इच्छा असूनही पार्किंग नियमांचे पालन करता येत नाही. रस्त्यावर जिथे मोकळी जागा दिसेल तेथे चारचाकी, दुचाकी उभी करावी लागते. शहरात दररोज शेकडा चारचाकी, दुचाकी टोइंग करून चौकीवर नेल्या जातात, अशास्त्रीय पद्धतीने वाहनांची हाताळणी केल्याने गाडय़ांचे नुकसान होते व चालकांची कोणतीही चूक नसताना भरुदड भरावा लागतो. ठाण्यात प्रथम सर्व रस्त्यांवर हे फलक बसवण्याची, ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी व मगच कॅमेरे बसवावे.
सुहास शिंदे, ठाणे