शहापूर:  करोना विषाणूच्या संक्रमणात ग्रामीण भागातही आता वाढ होते आहे. शहापुरात एकचवेळी तीन रुग्णांना करोनाची लागण झाली.  तर दोघे जण संशयित आहेत. एकाचवेळी तीन रूग्ण आढळून आल्याने शहापुरात भीती पसरली असून तालुक्यात आतापर्यंत एकूण पाच रुग्ण करोना विषाणू ने बाधित झाले आहेत.

शहापुरात १७ एप्रिल ला तहसील कार्यालय परिसरात राहणारा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर वासिंद येथे एक असे दोन रुग्ण याआधी करोना विषाणू ने बाधित असल्याचे आढळून आले होते. शुक्रवारी शहापुरातील तावडे नगर येथे एक, गोठेघर येथे एक व कसारा येथे विलगिकरण कक्षातील एक असे तीन रुग्ण कोरोना विषाणूने बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे शहापुरातल्या करोना रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. तर कसारा येथील विलागीकरण कक्षातील अन्य दोघे जण संशयित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, तीन बाधित रुग्णांना ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी सांगितले. शहापुरात प्रथम आढळून आलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील क्वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्तींच्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत तर त्यानंतर आढळून आलेल्या व शुक्रवारी रात्री अहवाल प्राप्त झालेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना कसारा येथील शेट्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात व दहागाव येथील आदिवासी आश्रमशाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामध्ये एक १७ वर्षीय मुलगी तसेच एक महिला व तिच्या अवघ्या १ महिन्याच्या बाळाला तात्पुरत्या स्वरूपात दहागांव येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान,  शहापूरमध्ये पुन्हा प्रतिबंधित क्षेत्राचा आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे  करण्यात येत आहे. शहापूर, गोठेघर व कसाऱ्यात आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या वास्तव्याच्या ठिकाणाला केंद्रबिंदू ठरवून हा सर्व्हे करण्यात येत आहे. हा सर्व्हे पुढील १४ दिवस चालणार आहे. या सर्व्हेमध्ये सर्व पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व कमी जोखमीच्या व्यक्तींची नावे चौकशीतून निष्पन्न झाल्यानंतर त्या व्यक्तीना क्वारंटाइन करुन त्यांची स्वॅब चाचणी केली जाणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी सांगितले.