सोनसाखळी चोरांचा अड्डा अशी बदनाम ओळख असणाऱ्या कल्याणजवळील आंबिवलीतील इराणी वस्तीवर बुधवारी रात्री उशिरापर्यंत ठाणे शहर आणि पालघर पोलिसांनी संयुक्तपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवून पाच रेकॉर्डवरच्या सोनसाखळी चोरांना जेरबंद केले. या कारवाईमध्ये पोलिसांना १९ बेवारस मोटारसायकली सापडल्या आहेत. या मोटारसायकलींचे मालक कोण आहेत आणि त्यांचा वापर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांसाठी झाला आहे का, याचा सविस्तर तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील वेगवेगळ्या विभागामध्ये सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने महिला हैराण झाल्या आहेत. या चोरटय़ांचा आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये आश्रयस्थान असल्याचे उघड झाले आहे. असे असतानाच पालघर पोलीस सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांच्या मागावर होते आणि हे दोन्ही आरोपी इराणी वस्तीमध्ये राहत असल्याचे समोर आले होते. मात्र, या वस्तीमध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे पालघर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनसाठी वसई न्यायालयाकडून परवानगी घेतली. त्यानंतर  कल्याणमधील पाटीलनगर, आंबिवली तसेच इंदिरानगर येथे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.
या कारवाईत मजलूम ऊर्फ जग्गू फैयाज इराणी (३५), अब्बास सलिम काझी हुसैन (२५), शहनवाज परवेझ सैयद (४८), मखमल शाहनवाज सैयद (१८) आणि खानम शाहनवाज सैयद (४५) या पाचजणांना अटक करण्यात आली वसई पोलीस सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी मजलूम आणि अब्बास या दोघांच्या मागावर  होते तर शहनवाज, मखमल आणि खानम या तिघांनी कल्याण परिसरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.

धडक कारवाई
या धडक कारवाईत पालघरच्या पथकात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १५१ पुरुष तर ३७ महिला कर्मचारी होते, तर कल्याणच्या पथकात गुन्हे शाखेचे दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक, १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उप निरीक्षक, दोन महिला पोलीस अधिकारी, ८० पुरुष व १९ महिला कर्मचारी होते.