02 March 2021

News Flash

ठाकुर्ली पुन्हा हादरली

मातृकृपा या दुर्घटनाग्रस्त इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असताना ढिगाऱ्याखालील सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण जखमी झाले.

| August 14, 2015 02:10 am

मातृकृपा या दुर्घटनाग्रस्त इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असताना ढिगाऱ्याखालील सिलेंडरचा स्फोट होऊन पाच जण जखमी झाले.   जखमींमध्ये पालिकेचे अधीक्षक, तीन मजूर यांसह एक स्थानिक महिलेचा समावेश आहे. या घटनेमुळे ठाकुर्ली पुन्हा एकदा हादरली आहे. ठाकुर्ली चोळेगाव येथील मातृकृ पा इमारत १५ दिवसांपूर्वी कोसळली होती. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता, तर ११ जण जखमी झाले होते. या घटनेतून स्थानिक रहिवासी अद्याप सावरलेले नसताना त्यांना गुरुवारी दुसरा धक्का बसला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम गेले कित्येक दिवस सुरू आहे. ‘फ’ विभागाचे अधीक्षक देवराज शेट्टे हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडणारा मुद्देमाल जप्त करून पोलिसांच्या हवाली करण्याचे काम पाहात होते. त्यांच्या हाताखाली तीन मजूर हा ढिगारा उपसण्याचे काम करीत होते. गुरुवारी दुपापर्यंत हे काम सुरळीतपणे सुरू होते.
एकीकडे पोकलेनच्या साहाय्याने ढिगारा बाजूला करण्यात येत होता, तर दुसरीकडे गॅस कटरच्या साहाय्याने सळ्या कापण्याचे काम सुरू होते. सायंकाळी चारच्या सुमारास दबलेल्या मजल्याखालील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक व पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या अपघातात पालिकेचे ‘फ’ विभागाचे अधीक्षक देवराज शेट्टे (५३), मजूर अविनाश वर्मा (५२), अब्बास अन्सारी (३०), सिराज अन्सारी (३५) हे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवराज शेट्टे हे ५४ टक्के भाजले असल्याने त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी दिली. स्थानिक रहिवासी स्मृती सावंत (३९) या ढिगाऱ्याखाली आपले काही साहित्य सापडते का, याची पाहाणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्याही या अपघातामध्ये जखमी झाल्या असून, त्यांना खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 2:10 am

Web Title: five hurt in cylinder blast at thakurli
टॅग : Cylinder Blast
Next Stories
1 भविष्यातील अत्याधुनिक उन्नत स्थानक
2 कळव्याच्या कळा संपणार!
3 कहाणी ‘त्या’ देशाची..
Just Now!
X