News Flash

तीन वर्षांत पाच लाख ठाणेकरांची भर!

मुंबईत न परवडणारे राहणीमान या कारणांमुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांतील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे

ठाणे, कळवा, मुंब्य्राची लोकसंख्या २२ लाखांवर: झोपडीवासीयांच्या संख्येतही ७५ हजारांची वाढ

वाढते नागरीकरण, दळणवळणाची जास्त साधने आणि मुंबईत न परवडणारे राहणीमान या कारणांमुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांतील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या एका सर्वेक्षणानुसार ठाणे पालिका हद्दीतील लोकसंख्या गेल्या तीन वर्षांत पाच लाखांनी वाढली असून, एकूण लोकसंख्येने २२ लाखांचा पल्ला ओलांडला आहे. विशेष म्हणजे, एकीकडे महापालिका आणि राज्य सरकार झोपडीमुक्त शहरासाठी उपाययोजना राबवत असताना ठाण्यात झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची संख्या ५० ते ७५ हजारांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागरीकरणाच्या आघाडीवर गेल्या काही वर्षांत ठाणे आणि नवी मुंबई या दोन शहरांची मुंबई महानगरासोबत जोरदार स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत ठाण्याने जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असून अवघ्या तीन वर्षांत या शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांनी वाढली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत ठाणे शहराचा समावेश व्हावा यासाठी महापालिकेने नुकताच एक आराखडा सादर केला आहे. हा आराखडा सादर करताना शहरातील नागरीकरणाचा आणि लोकसंख्येचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग जबरदस्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका हद्दीत ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन प्रमुख शहरांचा समावेश होतो. २००१ मध्ये या तीन शहरांमधील लोकसंख्या १२ लाख ६२ हजारांपर्यंत मर्यादित होती. २००१ ते २०११ या १० वर्षांमध्ये त्यामध्ये अवघ्या सात लाखांची भर पडली. याच काळात झोपडय़ांमधील लोकसंख्या सुमारे पाच लाखांनी वाढल्याचे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. म्हणजे नव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात ठाणे शहरातील बांधकाम व्यवसाय फारशा तेजीत नसल्याचे स्पष्ट होत असून, उलट बेकायदा झोपडपट्टय़ांमधून राहावयास आलेल्या रहिवाशांचा आकडा मात्र लक्षणीय असल्याचे दिसून येते. २०११ मध्ये ठाणे शहराची एकूण लोकसंख्या सुमारे १८ लाखांच्या घरात होती. त्यापैकी नऊ लाखांहून अधिक लोकसंख्या झोपडपट्टय़ांमधून वास्तव्य करत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. गेल्या चार वर्षांत मात्र शहरी भागांतील लोकसंख्या कमालीची वाढली असून आजतागायत हा आकडा २२ लाखांच्या पलीकडे पोहोचला आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. या काळात घोडबंदर, दिवा, शीळ या भागांतील लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2015 2:08 am

Web Title: five lakh population increased in thane in a year
टॅग : Increased,Thane
Next Stories
1 मद्यप्राशनाचा कायम परवाना २४ तासांत!
2 सोनसाखळी चोरांच्या शोधासाठी पोलिसांना ‘मित्रां’ची मदत
3 कल्याणच्या मैदानात प्रायोगिक चित्रपटांचा ‘तंबू’
Just Now!
X