* ठाणे जिल्ह्य़ातून पाच लाख मतदार वगळले 
* ठाणे, उल्हासनगर पालिका क्षेत्रात मात्र अल्पशी वाढ

नवी शहरे, गृहसंकुले, विकास प्रकल्प यामुळे वेगाने नागरीकरण होत असलेल्या ठाणे जिल्ह्य़ात गेल्या वर्षभरात साडेतीन टक्क्यांनी मतदार वाढले असले तरी याच काळात पाच लाख मतदारांची नावे यादीतून वेगवेगळ्या कारणांमुळे वगळण्यात आली आहेत, अशी माहिती ठाण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सोमवारी दिली. नव्याने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ८० हजार तर उल्हासनगरात २२ हजार मतदार वाढले आहेत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या दोन्ही शहरांची लोकसंख्या प्रत्यक्ष मतदारांच्या तुलनेत बरीच मोठी असल्याचे चित्र या निमित्ताने पुढे आले आहे.

ठाणे तसेच उल्हासनगर महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाली असली तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मात्र मतदारांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. जिल्हा निवडणूक विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या अंतिम यादीतील आकडेवारीनुसार ठाण्यात ७९ हजार तर उल्हासनगरमध्ये २२ हजार मतदार वाढल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे, कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदार वाढले असून हा आकडा २५ हजारांच्या घरात आहे.

ठाणे आणि उल्हासनगर या दोन्ही शहरांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होईल असे चित्र आहे. या निवडणूक तयारीचा एक भाग म्हणून ठाणे महापलिका निवडणूक विभागाने प्रभागनिहाय प्रारूप मतदारांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली. या यादीत दोन महिन्यांपूर्वी जिल्हा निवडणूक विभागाकडे नोंदणी करणाऱ्या नवीन मतदारांचा समावेश करून अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. येत्या १२ जानेवारीला महापालिकेचा निवडणूक विभाग मतदारांची अंतिम यादी जाहीर करणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वर्षी मतदार तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. अनेक मतदार स्थलांतरित होत असल्याने ही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचा शोध घेण्यात आला. या मतदारांची घरोघरी जाऊन निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानुसार त्या ठिकाणी वास्तव्यास नसलेल्या तसेच मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना यादीतून वगळण्यात आले. अशा मतदारांचा आकडा साडेपाच लाखांच्या घरात आहे, अशी माहिती मुकादम यांनी दिली.

हद्दीतील मतदार

१२,२७,९८४ – ठाणे पालिका हद्दीतील मतदार

४,०२,४३३ – उल्हासनगर पालिका