ठाणे परिसरात पाच नव्या पक्षी प्रजातींची नोंद; पक्षीगणनेत ११० जातींच्या २०१० पक्ष्यांचे दर्शन

पाण्यात पोहणाऱ्या माशावर झडप घालून त्याला काही क्षणात पाण्याबाहेर आणून खाद्य बनवणारा ‘फिश ईगल’ अर्थात ‘ऑस्पे’ या गरुडाच्या जातकुळीतील पक्ष्याने ठाण्यातील पक्षी निरीक्षकांना रविवारी दर्शन घडवले. ठाण्यातील होप आणि पर्यावरण दक्षता मंच संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या ठाणे पक्षीगणनेदरम्यान या पक्ष्याचे अभूतपूर्व असे शिकार कौशल्य अनुभवण्याची पर्वणीच पक्षी निरीक्षकांना लाभली.

एकाच वेळी शहरातील आठ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या पक्षीगणनेच्या या उपक्रमातून अनेक रंजक माहिती समोर आली आहे. शहरात आत्तापर्यंतच्या झालेल्या पक्षीगणनांमध्ये २०६ जातीच्या पक्ष्यांची नोंद झाली असून रविवारच्या पक्षीगणनेदरम्यान पाच नव्या प्रजातींच्या पक्षी नोंद निरीक्षकांनी घेतली आहे. त्यामध्ये वेस्टर्न रीफ हीग्रेट, जेकोबिन किंवा पीइड कुक्कू, पाईड किंगफिशर, लार्ज ग्रे बॅब्लर आणि कॉमन हुप या पाच जातींचा समावेश आहे, तर मासे पकडण्यामध्ये माहीर असलेला शिकारी फिश ईगल हे या गणनेचे वैशिष्टय़ होते.

ठाणे शहरातील पक्ष्यांचा शास्त्रोक्त अभ्यास व्हावा या उद्देशाने पक्षी निरीक्षकांनी सुरू केलेल्या अभियानाअंतर्गत दहाव्या पक्षीगणनेचे आयोजन करण्यात आले होते. होप व पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थांच्या माध्यमातून २०१३ पासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून शहरातील आठ वेगवेगळ्या भागांमध्ये ५१ पक्षी निरीक्षकांनी सहभाग घेऊन पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. ठाणे पूर्वेतील खाडीकिनारा, कोलशेत रस्ता, मुंब्रा टेकडी, मनोरुग्णालयाचा भाग, बाळकुम खाडी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मानपाडा परिसर, येऊरचे जंगल आणि पडले खिडकाळी या भागामध्ये एकाच वेळी पक्षी निरीक्षण करण्यात आले. या माहिती संकलनाचा उपयोग महानगरपालिका, वन विभाग, वन्यप्रेमी तसेच संशोधकांना होईल अशी माहिती समन्वयक रवींद्र साठय़े यांनी सांगितले. या गणनेमध्ये एका शालेय विद्यार्थ्यांंसह आठ महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी ११० प्रजातीच्या २०१० पक्ष्यांची नोंद करण्यात आली. हिवाळ्यात उत्तरेकडील स्थलांतरित पक्षी येत असल्याने या काळात जास्त पक्षी दिसतात. या ट्रेलमध्ये आदेश शिवकर, प्रतीक कुलकर्णी आणि अविनाश भगत या पक्षीतज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.

दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन..

मुंब्रा खाडी परिसरात आढळलेल्या ओस्प्रे या गरुडाच्या जातीने सर्वाचे लक्ष वेधले. पाण्यातील पक्ष्यावर झडप घालून पंजात पकडलेला मासा सुटण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच्या नखांच्या रचनेमुळे सुळसुळीत मासेसुद्धा त्याच्या तावडीतून सुटत नसल्याचे दिसून येत होते. या बरोबरच ब्लू रॉक ट्रश, कॉमन बझर्ड, शाहीन फॉलकॉन, विगर्स सनबर्ड, लेसर व्हाईट थ्रोट या दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडले.

पाईड कुक्कू पक्ष्याचा ठाण्यात डेरा..

पश्चिम घाटामध्ये दिसणारा पाईड कुक्कू म्हणजे चातक पक्षी हा मूळचा आफ्रिकेतील असून तो प्रजननासाठी भारतामध्ये दाखल होत असतो. नवे घरटे बनवण्याच्या भानगडीमध्ये पडण्याऐवजी हा पक्षी बॅबलर किंवा बुलबुल या पक्ष्यांच्या घरटय़ांमध्ये अंडी टाकतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या या पक्ष्याची नोंद यापूर्वी ठाण्यातील पक्षीगणनेमध्ये झाली नव्हती. रविवारी हा पक्षी ठाण्यातील पक्षी निरीक्षकांना दिसून आल्यामुळे या पक्ष्याचा यंदाच्या वर्षीचा निवास अधिक वाढल्याचे मत निरीक्षकांनी मांडले आहे.

पुढील पक्षी निरीक्षक कार्यक्रम..

हौशी पक्षीप्रेमींची संख्या वाढावी. त्यांना पक्ष्यांची शास्त्रोक्त माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘ठाणे पक्षी गणने’चे आयोजन केले जात आहे. हिवाळ्यापूर्वी आणि हिवाळ्यानंतर अशी दोन टप्प्यात पक्षीगणना केली जात असते. या पुढील पक्षीगणना रविवार १५ जानेवारी २०१७ रोजी होणार असून पक्षी निरीक्षकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.