07 April 2020

News Flash

ठाणे शहरात पाच नवे आठवडी बाजार

ब्रह्मांड, अष्टविनायक चौक, वृंदावन सोसायटी, कोपरी आणि पांचपाखाडी या ठिकाणी नियोजन 

ब्रह्मांड, अष्टविनायक चौक, वृंदावन सोसायटी, कोपरी आणि पांचपाखाडी या ठिकाणी नियोजन 

ठाणे : शेतकऱ्यांचा माल मध्यस्थांविना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ठाणे शहरात तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या आठवडी बाजारांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आठवडी बाजाराला मिळणाऱ्या ग्राहकांच्या प्रतिसादामुळे राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि संस्कार सेवा भावी संस्था, ठाणे यांच्या वतीने ठाणे शहरात आणखी पाच बाजार लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

शहरातील ब्रह्मांड, अष्टविनायक चौक, वृंदावन सोसायटी, कोपरी आणि पांचपाखाडी या ठिकाणी हे बाजार सुरू करण्यात येणार असून परवानगीसाठी लवकरच ठाणे महापालिकेला पत्र देण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी दिली.

शहरातील ग्राहकांना थेट शेतातून ताजी भाजी स्वस्त दरात मिळावी. तसेच कोणत्याही दलाल आणि अडत्याशिवाय शेतकऱ्यांना माल विकता यावा, या उद्देशाने ठाणे शहरातील गावदेवी मैदानात २०१६ मध्ये राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि ठाण्यातील संस्कार सेवा भावी संस्थेच्या वतीने आठवडी बाजार सुरू करण्यात आला होता. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होणारा हा राज्यातला पहिला बाजार ठरला होता. या बाजारात सुरुवातीला केवळ भाजीपाला विक्री करण्यात येत होती. मात्र, विक्री करण्यात येणाऱ्या भाज्या ताज्या असल्याने ठाण्यातील नागरिकांचाही या बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर ठाण्यातील उमा निळकंठ मैदान, कोलबाड, एसआरए इमारत पवारनगर, राबोडी, वेदांत मैदान, माझी आई शाळा मैदान आणि ढोकाळी या सात ठिकाणी टप्प्याटप्प्याने आठवडी बाजार सुरू करण्यात आले होते.

या बाजारांमध्ये ठाणे, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या भागांतील शेतकऱ्यांचे गट मालाची विक्री करण्यासाठी येतात. हे शेतकरी भाजीपाल्यासोबतच धान्य, कडधान्य आणि फळांचीही विक्री करण्यात येत असून यामुळे शहरातील नागरिकांना त्यांचा घराजवळ ताजा शेतमाल मिळू लागला. त्याशिवाय कोणीही मध्यस्थी नसल्याने भाजीपाला आणि धान्याचे दरही कमी असतात. त्यामुळे शहरातील नागरिक या बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत. ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन ठाणे शहरात आणखी पाच नवे शेतकरी बाजार सुरू करण्याचा निर्णय संस्कार सेवा भावी संस्था, ठाणे आणि राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.

शहरातील ब्रह्मांड, अष्टविनायक चौक, वृंदावन सोसायटी, कोपरी आणि पांचपाखाडी या ठिकाणी हे नवे पाच बाजार सुरू करण्यात येणार असून हे बाजार भरवण्याच्या परवानगीसाठी लवकरच ठाणे महापालिकेला पत्र देण्यात येणार असल्याची माहिती, ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी दिली.

आठवडी बाजार हा केवळ बाजार नसून ही एक चळवळ आहे. या बाजाराला ठाणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या बाजारामुळे शहर आणि गाव यांच्यातील आर्थिक  दरी मिटण्यास मदत होत आहे. विस्तारणाऱ्या ठाणे शहरात लवकरच असे पाच नवे बाजार सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

– संजय केळकर, आमदार, ठाणे शहर

धान्य आणि कडधान्य खरेदीकडे ओढा

ठाणे शहरात भरणाऱ्या बाजारांमध्ये विक्रीसाठी येणारे गहू, तांदूळ, मूग, मटकी, हरभरे आणि वाटाणे हे धान्य उत्तम दर्जाचे असते. तसेच त्यांची किंमत शहरातील बाजारभावापेक्षा तुलनेत ५ ते ५० रुपयांनी कमी असल्याने ग्राहक या आठवडी बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत, अशी माहिती संस्कार सेवा भावी संस्थेच्या सदस्यांनी दिली.

अशी परवानगी या बाजारात केवळ शेतकऱ्यांना विक्रीसाठी परवानगी असून त्यासाठी या शेतकऱ्यांचे सातबारा दाखले जमा करण्यात येतात. या दाखल्यांच्या प्रती पणन मंडळाकडे पाठवण्यात येतात. त्यानंतर पणन मंडळ ज्या ठिकाणी बाजार सुरू करायचा आहे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत पत्रव्यवहार करतात. या पत्रव्यवहारानंतर आठवडी बाजारांना स्थानिक स्वराज्य संस्थांची अधिकृत परवानगी मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 3:51 am

Web Title: five new weekly markets in thane city zws 70
Next Stories
1 मेट्रो कामांमुळे झोपमोड!
2 ठाण्यातील राष्ट्रध्वजाची दुरवस्था
3 कल्याण ‘आरटीओ’ला स्वतंत्र इमारत
Just Now!
X