अंबरनाथमध्ये पोलिसांसमक्ष रिक्षाचालकांचा ‘व्यवसाय’

बदलापूर येथील एरंजाड येथे एक वाहतूक पोलीस लाच स्वीकारत असतानाची चित्रफीत समाजमाध्यमावर पसरल्यानंतर (व्हायरल) वाहतूक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. वाहतूक पोलिसांच्या कारवाईत भेदभाव नवीन नाही. तसाच काहीसा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला असून रिक्षाचालक पोलिसांच्या डोळ्यादेखत पाच प्रवाशांची वाहतूक करताना दिसत आहेत. त्यामुळे वाहन तपासणीचा हा सोपस्कार कशासाठी, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

अंबरनाथ वाहतूक पोलिसांच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यात कमी असलेल्या मनुष्यबळाचा योग्यरीत्या वापर न केल्यानेही वाहनचालकांच्या आणि नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागते. वाहन तपासणीत अनेकदा भेदभाव केला जात असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस अनेकदा वादाच्या भोवऱ्यात असतात. त्यातच आता अंबरनाथ शहरात सुरू असलेली वाहतूक पोलिसांची कारवाईही वादाचा विषय बनली आहे.

अंबरनाथ पूर्वेतील स्वामी समर्थ चौक आणि पश्चिमेतील अंबरनाथ पोलीस ठाण्याबाहेरील चौकात वाहतूक पोलीस नियमितपणे कारवाई करत असतात. मात्र या कारवाईत पाच प्रवासी बसवून अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडे वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे सोडून दुचाकीस्वारांना लक्ष्य केले जाते. त्याच वेळी रिक्षाचालक पाच प्रवासी बसवून रिक्षा नेत असतात. अनेकदा तपासणीच्या ठिकाणापासून काही फुटांवर रिक्षा थांबून त्यातील पाचपैकी दोन प्रवासी उतरतात. त्यानंतर पोलिसांसमोरून चालत जाण्याचा देखावा करून पुढे पुन्हा तेच प्रवासी रिक्षात बसवले जातात. हे सर्व वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर होत असते. मात्र तपासणीच्या ठिकाणीच नियम आणि इतरत्र नाही, असा कारभार वाहतूक पोलिसांचा असल्याचे समोर आले आहे.

अपघाताला आमंत्रण

अशाच एका तपासणीच्या ठिकाणी ‘अंबरनाथ सिटीझन फोरम’च्या सदस्याने वाहतूक पोलिसांना हटकले असता, त्याचीच चौकशी पोलिसांनी सुरू केली. मात्र हा प्रकार मोबाइलमध्ये चित्रित होत असल्याचे कळताच त्यांनी माघार घेत विषय संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वेळी पाच प्रवासी असलेल्या रिक्षा जाताना त्या चित्रफितीत कैद झाले आहे. त्यामुळे हा तपासणीचा सोपस्कार कशासाठी, असा सवाल उपस्थित होतो आहे. पाच प्रवासी नेऊन अपघाताला आमंत्रण देण्याचा रिक्षाचालकांच्या या प्रकारावर आळा घालण्याची तर वाहतूक पोलिसांनीही आपला कारभार सुधारण्याची मागणी नागरिक करत आहेत.