21 September 2020

News Flash

वसईत पाच, बदलापुरात दोघे बुडाले

दुसऱ्या घटनेत बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदीवरील बंधाऱ्याजवळ दोन तरुण बुडाले

(संग्रहित छायाचित्र)

वसई/बदलापूर : धुळवडीनिमित्त सर्वत्र रंगांची उधळण सुरू असताना अनेक ठिकाणी दुर्घटनांचीही नोंद झाली. वसईत समुद्रकिनाऱ्यावर धुळवड साजरी करण्यासाठी गेलेले पाच जण गुरुवारी बुडाले. दुसऱ्या घटनेत बदलापूरमधील उल्हास नदीच्या बंधाऱ्याजवळ पोहोण्यासाठी गेलेले दोघेजण बुडाले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही.

वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड येथील गोकुळ पार्क संकुलात राहणारे मौर्या आणि गुप्ता कुटुंबीय धुळवड साजरी करण्यासाठी नालासोपारा पश्चिमेच्या कळंब समुद्रात गेले होते. या दोन्ही कुटुंबांतील सदस्य दुपारी २ वाजण्याच्या सुमारास समुद्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने शीतल गुप्ता (३२), कांचन गुप्ता (३८), निशा मौर्या (४२), त्यांची दोन मुले प्रिया मौर्या (१७) आणि प्रशांत मौर्या (२०) हे समुद्रात बुडाले. प्रशांतचा मृतदेह भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर सापडला. उर्वरित चौघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

दुसऱ्या घटनेत बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदीवरील बंधाऱ्याजवळ दोन तरुण बुडाले. बदलापूर कात्रप भागातील कल्पेश चौधरी, कार्तिक लाडी आणि त्यांचा आणखी एक मित्र पोहोण्यासाठी तिथे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने कल्पेश बुडाला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार्तिकही बुडाला. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या दोघांचाही शोध लागलेला नसल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी रमेश पाटील यांनी सांगितले.

मुंबईत धुळवडीदरम्यान ५२ जखमी

धुळवड साजरी करताना मुंबईत विविध ठिकाणी ५२ जण जखमी झाले. त्यापैकी २० जण घसरून पडले. डोळ्यांत, कानांत रंग गेल्याने आणि त्वचेवर रंगांचा दुष्परिणाम जाणवल्यानेही अनेकांनी रुग्णालय गाठले. केईएम रुग्णालयात सर्वाधिक २३, नायरमध्ये १३, शीव आणि जेजे रुग्णालयात प्रत्येकी तिघांवर उपचाराची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 2:28 am

Web Title: five people die due to drowning in vasai
Next Stories
1 बैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर
2 पालघरमध्ये अॅक्रिलिक कंपनीत भीषण आग
3 प्लास्टिक पिशव्यांची धुळवड
Just Now!
X