दुबईत रुग्णालय उभारण्याच्या आमिषाने पाच जणांना गंडा

ठाणे : दुबईत भागीदारीमध्ये रुग्णालय उभारण्याचे आमिष दाखवून वर्तकनगर येथील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्यासह पाच जणांना भामटय़ा दाम्पत्याने २ कोटी १५ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी सोमवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

वर्तकनगर येथील शिवाईनगर भागात डॉक्टर दाम्पत्याचे एक रुग्णालय आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी त्यांच्या रुग्णालयात रंगु रामगोपल व त्यांची पत्नी विद्या रामगोपाल उपचारांसाठी आले होते. त्यावेळी विद्या रामगोपाल यांनी आमचा दुबईमध्ये बांधकाम व्यवसाय असून आम्हाला तिथे तुमच्यासह भागीदारीत रुग्णालय उभारायचे असल्याची बतावणी केली. त्यावेळी या दाम्पत्यानेही होकार दिला. तसेच डॉक्टर दाम्पत्याने त्यांच्या ओळखीतील आणखी चौघांना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. त्यावेळी या चौघांनीही भागीदार होण्याची तयारी दर्शविली. यानंतर रंगु याने या पाच भागीदारांना दुबईत ज्या ठिकाणी रुग्णालय उभारायचे आहे, तिथे नेले. दुबईत त्यांची बैठक झाली. या बैठकीत रुग्णालयातून मिळणाऱ्या नफ्यातील २० टक्के रंगु यांचे असतील तर उर्वरित ८० टक्के पाच जणांनी विभागून घ्यावेत, असे ठरले.

सुमारे दीड वर्षांपूर्वी जमिनीच्या करारासाठी डॉक्टर दाम्पत्य आणि त्यांच्या भागीदारांनी ८० लाख रुपये रंगु याच्या खात्यात जमा केले. त्यानंतर दुबई सरकारच्या कागदपत्रांची पूर्तता करायची असल्याचे सांगून रंगु आणि त्यांच्या पत्नीने डॉक्टर दाम्पत्य आणि त्यांच्या चार मित्रांकडून तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये घेतले. दीड वर्ष उलटत असतानाही रुग्णालयाच्या कामकाजाची कोणतीही माहिती रंगु याने भागीदारांना दिली नाही.दाम्पत्य दुबईला गेले असता बांधकाम सुरू नसल्याचे दिसले. चौकशी केली असता, संबंधित जमिनीचे कोणतेही व्यवहार झाले नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.