ठाणे : महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट होऊ लागल्याने पाच खासगी रुग्णालयांची कोविड मान्यता पालिकेने रद्द केली आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांवर उपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच आणखी चार रुग्णालयांनी कोविड मान्यता रद्द करण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्यांना कोविड रुग्णालये म्हणून घोषित केले होते. अशा प्रकारे गेल्या काही महिन्यांत २४ रुग्णालयांना पालिकेने कोविड रुग्णालयांची मान्यता देऊ केली होती.

शहरातील रुग्णसंख्येच्या तुलनेत ही रुग्णालयेही अपुरी पडू लागल्यामुळे महापालिकेने बुश कंपनी, घोडबंदरमधील भाईंदरपाडा आणि होरायझन शाळेतील कोविड काळजी केंद्र उभारली होती.

याशिवाय एमएमआरडीच्या माध्यमातून ग्लोबल कोविड रुग्णालय तर म्हाडाच्या माध्यमातून कळवा आणि मुंब्रा भागात कोविड रुग्णालयांची उभारणी करण्यात आली होती.   ठाणे महापालिका हद्दीत करोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही महिन्यांपासून घट होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता शहरातील पाच खासगी रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द केली आहे.

त्यामध्ये काळशेकर, आरोग्यम, वेलम, स्वस्तिक आणि मॉ वैष्णवी या रुग्णालयांचा समावेश आहे. कोविड मान्यता रद्द झाल्याने या ठिकाणी आता इतर रुग्णांवर उपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोविडमुक्त रुग्णालये

रुग्णालय             खाटांची  क्षमता

काळशेकर, मुंब्रा         १००

आरोग्यम, कोपरी        ५०

वेलम, पोखरण रोड      २४

स्वस्तिक, वागळे        २५

मॉ वैष्णवी, कोपरी       २०

बंद झालेले केंद्र

ठिकाण          खाटांची क्षमता

भाईंदरपाडा                  ७००

ए आणि सी विंग

होरायझन शाळा           २५०

बुश कंपनी, वागळे       ४००

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण २४ खासगी कोविड रुग्णालये आहेत. परंतु रुग्ण नसल्यामुळे पाच रुग्णालयांची कोवीड मान्यता रद्द केल्याने तिथे इतर रुग्णांवर आता उपचार करता येणार आहेत. महापालिकेची ग्लोबल, कळवा आणि मुंब्य्रातील रुग्णालये सुरू राहणार आहेत. बुश कंपनी, होरायझन आणि भाईंदरपाडा येथील कोविड काळजी केंद्र बंद करण्यात आले आहे.    तर, व्होल्टास आणि बोरिवडेचे रुग्णालय अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

-डॉ. राजू मुरूडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका