चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ७ टक्केच

ठाणे : ठाणे महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरात करोना संशयितांच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला असून गेल्या पाच महिन्यांच्या काळात प्रथमच दिवसाला पाच हजार चाचण्यांचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.

जिल्ह्य़ातील इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक चाचण्या होत असून त्यापाठोपाठ नवी मुंबईत दिवसाला सरासरी अडीच हजार तर कल्याण-डोंबिवलीत सरासरी दोन हजारांच्या घरात चाचण्या केल्या आहेत. यामध्ये प्रतिजन चाचण्यांचाही समावेश आहे. ठाण्यात चाचण्यांची संख्या वाढूनही करोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ६ ते ७ टक्के आहे. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये चाचण्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्ष संख्या मात्र खूपच कमी असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. शीघ्र प्रतिजन चाचण्यांबरोबरच आरटीपीसीआर चाचण्या वाढविल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तीन हजारांच्या आसपास चाचण्या होत होत्या. त्यात वाढ करून त्या चार हजारांपर्यंत नेण्यात आल्या. असे असतानाच दोन दिवसांपूर्वी पाच हजार चाचण्यांचा टप्पा महापालिकेने पार केला. एकीकडे चाचण्यांची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ६ ते ७ टक्क्यांच्या आसपास आहे. पाच हजार चाचण्यांच्या मागे २०० ते ३०० करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

इतर शहरांची मात्र पिछाडी

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज पाच हजारांच्या आसपास करोना चाचण्या होत असल्या तरी त्या तुलनेत जिल्ह्य़ातील इतर महापालिकांमध्ये मात्र फारच कमी चाचण्या होत आहेत. कल्याण-डोंबिवली शहरात दोन हजारांच्या आसपास चाचण्या होत असून त्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज अडीच हजारांच्या आसपास करोना चाचण्या होत आहेत. नवी मुंबई महापालिकेने चाचण्यांसाठी स्वत:ची प्रयोगशाळा स्थापन केल्यानंतर ही संख्या वाढेल, असा दावा केला जात होता. नवी मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत करोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १२ टक्क्यांच्या आसपास आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी तीनशेच्या घरात चाचण्या होत आहेत. हे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. या चाचण्यानंतर येथे करोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ८.६ टक्के आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ३७० चाचण्या होत आहेत. महापालिकेने शहरात ८०० पेक्षा अधिक चाचण्या केल्या जातील, असा दावा केला होता. प्रत्यक्षात हा आकडा गाठताना तेथील प्रशासनाची अजूनही दमछाक होत आहे.

ठाणे स्थानकावर चाचणी केंद्र

ठाणे महापालिका क्षेत्रातील करोनाबाधित रुग्णांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना उपचारासाठी दाखल करता यावे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तात्काळ विलगीकरण करता यावे. यासाठी महापालिका प्रशासनाने शीघ्र प्रतिजन चाचण्यांची मोहीम गेल्या काही दिवसांपासून हाती घेतली आहे. प्रभाग समितीस्तरांवर शीघ्र प्रतिजन चाचण्यांची केंद्रे सुरू करण्यापाठोपाठ आता ठाणे स्थानकावरही प्रशासनाने अशाच प्रकारचे चाचणी केंद्र सुरू केले आहे. सुरुवातीला करोनाचा संसर्ग वाढत होता, त्या वेळेस अनेक जण आपल्या मूळगावी निघून गेले होते. परंतु आता शहरात करोना संसर्ग कमी होऊ लागताच परराज्यात गेलेले नागरिक पुन्हा शहरात येऊ लागले आहेत. या नागरिकांमुळे शहरात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्थानक परिसरात शीघ्र प्रतिजन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले.

ठाणे स्थानकात ५ दिवसांत ३७ करोना रुग्ण

करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने परराज्यातून रेल्वेने ठाणे शहरात येणाऱ्या ३ हजार ३८० नागरिकांची गेल्या पाच दिवसांत शीघ्र प्रतिजन चाचण्यांद्वारे तपासणी केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत केवळ ३७ नागरिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून परराज्यांतून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

स्थानकातील पाच दिवसांतील बाधित

दिवस       चाचण्या   रुग्ण

३ सप्टेंबर      ५९७     २१

४ सप्टेंबर      ६१८     २

५ सप्टेंबर      ६५०     ४

६ सप्टेंबर      ६७२     ५

७ सप्टेंबर      ८४३     ५

एकूण        ३३८०     ३७

रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४.३३ टक्के

संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या पाच दिवसांत एकूण २० हजार ३८१ नागरिकांची शीघ्र प्रतिजन चाचणी करण्यात आली आहे. त्यात ८८३ नागरिक करोनाबाधित आढळून आले आहेत. एकूण चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४.३३ टक्के आहे. संपूर्ण पालिका क्षेत्रात झालेल्या एकूण २० हजार ३८१ चाचण्यांपैकी ३ हजार ३८० चाचण्या ठाणे स्थानक परिसरात झाल्या आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.