खाडीकिनारी स्थलांतरित पक्ष्यांची गजबज; मात्र हंगाम लांबणीवर

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले असले तरी, नेहमीच्या तुलनेत यंदा त्यांचे प्रमाण तुरळक आहे. गुजरात, राजस्थान आणि कच्छ भागातील मुबलक पाणीसाठय़ामुळे फ्लेमिंगोंच्या प्रजननाचा काळ लांबल्याने त्यांचे आगमनही लांबणीवर पडल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र, उशिरा का होईना, फ्लेमिंगो महिनाभराने खाडीकिनारी दाखल होतील, असे सांगितले जात आहे.

उत्तरेकडे थंडी वाढू लागताच फ्लेमिंगोंसह विविध ठिकाणचे स्थलांतरित पक्षी मुंबई, ठाण्याच्या खाडीकिनारी दाखल होतात. मात्र, यंदा जानेवारीचा पहिला पंधरवडा लोटल्यानंतरही फ्लेमिंगो पक्ष्यांची फारशी गर्दी दिसलेली नाही. गतवर्षी लांबलेला फ्लेमिंगोंचा परतीचा प्रवास याचे एक कारण असल्याचे अभ्यासक सांगतात. मार्च महिन्यात दरवर्षी आपल्या मूळ ठिकाणी परतणारे फ्लेमिंगो २०१७ च्या ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातच होते, असा दावा या क्षेत्रातील अभ्यासक करत आहेत. त्याचप्रमाणे गुजरात, राजस्थानमध्ये यंदा पाण्याची मुबलक स्थिती असल्याने फ्लेमिंगोंनी मूळ अधिवासातील मुक्काम वाढवला आहे.

ठाण्यातील काही पक्षी निरीक्षक गुजरात, राजस्थान येथे पक्षी निरीक्षणासाठी गेले असताना त्या ठिकाणी पाण्याची पातळी जास्त असल्याचे दिसून आले. पाणी मुबलक असल्याने त्या ठिकाणी प्रजननासाठी आवश्यक असणारा चिखलही अस्तित्वात आहे. परिणामी प्रजननाचा काळ पुढे गेला असल्याने प्रजनन झाल्यावर पिल्ले काही प्रमाणात मोठी झाल्यावर फ्लेमिंगो मोठय़ा प्रमाणात ठाणे, शिवडी, उरण खाडीकिनारी दाखल होतील, असे  पर्यावरण दक्षता मंडळाचे अविनाश भगत यांनी सांगितले.

आगमनास विलंब का?

गुजरात, राजस्थान, कच्छ येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे प्रजनन होत असते. या ठिकाणी असलेल्या मुबलक पाण्यामुळे साठणारी दलदल प्रजनन काळात फ्लेमिंगोसाठी उपयुक्त असते. चिखलाने साचणाऱ्या दलदलीत फ्लेिमगो पक्षी त्यांची घरटी बांधतात. डिसेंबर महिन्यापासून गुजरात, राजस्थान, कच्छ या ठिकाणी पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात होते. या ठिकाणचे पाणी आटल्यावर फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन महाराष्ट्रात ठाणे, उरण, शिवडी येथील खाडी किनाऱ्यावर होत असते. मात्र, यंदा मूळ अधिवासात मुबलक पाणी असल्याने फ्लेमिंगोंनी अद्याप मुंबईची वाट धरलेली नाही.

गुजरात, राजस्थान येथे या काळात फ्लेमिंगो पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासते. पाणी सुकत असल्याने चिखल उपलब्ध होत नसल्याने ते प्रजनन करू शकत नाहीत. यंदा मात्र या ठिकाणी पाणी अद्याप मुबलक आहे. त्यांना प्रजननासाठी आवश्यक असणारी दलदल या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे प्रजननाचा काळ थोडा लांबणीवर आहे. प्रजनन झाल्यावर फ्लेमिंगो काही दिवसातच मुंबई, ठाणे, भाईंदर खाडीकिनारी दाखल होतील.

 डॉ. असद रेहमानी, निवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार ‘बीएनएचएस’