अळ्या, शेवाळ, क्रस्टेशियन जिवांमुळे मुबलक खाद्य

ऋषीकेश मुळे, ठाणे :

गुजरात, राजस्थान आणि कच्छ येथून मुंबई आणि उपनगरांच्या दिशेने येणारे फ्लेमिंगो पक्षी ठाणे पूर्वेतील कोपरी मिठबंदर खाडीकिनारी अधिक काळ विसावा घेऊ लागले आहेत. नवी मुंबई आणि मुंबई खाडी भागाच्या तुलनेत ठाणे मिठबंदर खाडीकिनारी अळ्या, शेवाळ, लहान झिंगे, क्रस्टेशियन या फ्लेमिंगोंच्या आवडत्या खाद्यपदार्थाचे प्रमाण वाढू लागल्याने हा संपूर्ण पट्टा या पक्ष्यांसाठी आवडते ठिकाण बनले आहे. नवी मुंबईतील खाडीकिनाऱ्यांवर एरवी विसावणारे फ्लेमिंगो देखील कोपरी किनाऱ्यांवर येऊ लागल्याचे पक्षी निरीक्षकांचे निरीक्षण आहे.

हिवाळा सुरू झाल्यानंतर फ्लेमिंगो पक्षी ठाणे, नवी मुंबई, मुंबईच्या खाडीकिनारी येत असतात. गेल्यावर्षीपेक्षा यंदा ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे पक्षी निरीक्षकांकडून सांगण्यात आले आहे. नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील खाडीकिनारची कांदळवने कमी झाल्याने तसेच येथील खाडीकिनारी फ्लेमिंगोंचे आवडते खाद्य मिळत नसल्याने फ्लेमिंगो पक्ष्यांनी त्यांचा मोर्चा ठाणे मिठबंदर खाडीकिनारी वळवला आहे, असा दावा पक्षी निरीक्षक करू लागले असून या ठिकाणी दिसणारे पक्ष्यांचे थवे या गोष्टीची साक्ष देऊ लागले आहेत. ठाणे आणि आसपासच्या परिसरात कार्यरत असलेल्या पक्षी निरीक्षकांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार गेल्या काही महिन्यांत एक लाखांहून अधिक संख्येने फ्लेिमगो पक्षी मिठबंदर खाडी परिसरात भ्रमंती करत आहेत तसेच ठाणे खाडी अधिक प्रदूषित असल्याने या भागात फ्लेमिंगोंच्या खाद्यासाठी आवश्यक जिवांची उत्पत्ती अधिक होते, त्यामुळेच फ्लेमिंगो हे कोपरी खाडीकिनारी अधिक येत असल्याचे स्प्राऊट्स संस्थेचे आनंद पेंढारकर यांनी सांगितले.

ठाणे शहराचा खाडीकिनारा दोन वर्षांपूर्वी फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र या खाडीकिनारी विश्रांती घेण्यासाठी येणाऱ्या फ्लेमिंगोंच्या वाढत्या संख्येचे कारण समोर आले आहे. ठाणे खाडीत सोडण्यात येणाऱ्या मैलाचे प्रमाण अधिक आहे. या मैलामुळे खाडीतील प्राणवायू कमी होतो. मात्र मैलाचे विघटन करणारे इतर जीव खाडीमध्ये वाढीस लागतात.

अळ्या, शेवाळ, लहान खाडी झिंगे आणि क्रस्टेशियन या खाडीत मिळणाऱ्या जिवांपासून फ्लेिमगोंना कॅरिटोनॉईड नावाची प्रथिने मिळतात. ही प्रथिने फ्लेिमगोंच्या वाढीसाठी आवश्यक असल्याचे निसर्ग अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. या प्रथिनांमुळेच फ्लेमिंगो पक्ष्यांचा शरीराचा रंग गुलाबी होत असल्याचेही निसर्ग अभ्यासकांनी सांगितले.

मुंबई आणि नवी मुंबईच्या खाडीकिनाऱ्यापेक्षा ठाणे मिठबंदर खाडीकिनारी फ्लेमिंगोंना आवश्यक खाद्यपदार्थ मिळतात. या ठिकाणचा कांदळवन परिसर फ्लेमिंगोंसाठी लाभदायक आहे. त्यामुळे या भागात फ्लेमिंगोंची संख्या अधिक पाहायला मिळते.

– मकरंद केतकर, निसर्ग अभ्यासक