मानसी जोशी-आशीष धनगर

पेणमधील मूर्तिकारांचे मोठे नुकसान; आवक घटल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ

ऑगस्ट महिन्यात कोकणात कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका यंदा गणेशोत्सवाला बसला आहे. पेण तालुक्यात आलेल्या महापुराचे पाणी गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये शिरल्याने येथील गणेशमूर्तीसोबत प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीच्या गोण्याही पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे यंदा पेण तसेच आसपासच्या परिसरांतून मुंबई, ठाण्यात आयात होणाऱ्या गणेशमूर्तीचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. उत्पादन घटल्याने गणेशमूर्तीच्या किमतीही वधारल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात राज्यभरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टी महागल्या असताना आता गणेशमूर्तीही महागल्या आहेत. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्य़ातील पेण तालुक्यात तयार करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पेण येथील जोहे, कळवा, दादर आणि हमरापूर या भागात गणेशमूर्ती बनविण्याचे लहान-मोठे ४०० कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये दरवर्षी ९ ते १० लाख कच्च्या गणेशमूर्तीची निर्मिती करण्यात येते. या सर्व मूर्ती महाराष्ट्रातील विविध भागांत विक्रीसाठी पाठविण्यात येतात. या ठिकाणी आलेल्या महापुराचे पाणी पेण येथील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये शिरले होते. त्यामुळे या कारखान्यांमधील अनेक तयार गणेशमूर्तीसह प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीच्या गोण्याही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे यंदा गणेशमूर्तीचे उत्पादन ५० टक्क्यांवर आले आहे.

या वर्षी ४ ते ५ लाख गणपतीच्या मूर्ती पेण येथून मुंबई, ठाण्यात विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. दरवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्याहून कमी आहे, अशी माहिती येथील मूर्तिकारांनी दिली. उत्पादन घटल्याने गणेशमूर्तीच्या किमती वधारल्या असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची किंमत एक हजाराने तर शाडूच्या मूर्तीची किंमत पाचशे रुपयांनी वाढली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एक फूट मूर्तीची किंमत आधी ८०० रुपये एवढी होती तर आता १२०० रुपये एवढी आहे. तर २ फुटांची मूर्ती २ हजार ५०० रुपये होती ती आता ३ हजार ५०० रुपये एवढी आहे. शाडूच्या १ फुटाच्या मूर्तीची किंमत २ हजार रुपये होती, आता तीच मूर्ती २ हजार ५०० रुपयांना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ४ हजार ५०० रुपयांना मिळणारी २ फुटांची शाडूची मूर्ती आता ५ हजार रुपयांना मिळत आहे.