बदलापुरातील शेकडो इमारती पुराच्या छायेत

सागर नरेकर, लोकसत्ता

An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
statue of Gond raje Bakt Buland Shah the founder of Nagpur city is Neglected by government
नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!
Development of six villages
बीकेसीच्या धर्तीवर मढ, मार्वेसह सहा गावांचा विकास लांबणीवर?

बदलापूर : गेल्या वर्षी एकाच आठवडय़ाच्या अंतराने उल्हास नदीला दोनदा आलेल्या पुराचा फटका बदलापूर शहरातील शेकडो कुटुंबांना बसला होता. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या या नदीच्या पुररेषेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यंदा महिनाभरापूर्वीच जलसंपदा विभागाने उल्हास नदीची पुररेषा निश्चित केली असून बदलापुर शहरातील शेकडो

बांधकामे या पुररेषेत आल्याचे दिसून येत आहे. मात्र, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून या पुरक्षेत्रातील इमारतींसाठी नविन नियमावली आखण्याचे काम रखडले असल्याने या इमारतींना धोका कायम आहे.

बदलापूर शहर हे उल्हास नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या वर्षांत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकाच आठवडय़ाच्या अंतराने या नदीला दोनदा आलेल्या पुरामुळे बदलापूर शहराला पुराचा फटका बसला होता. या नदीला २००५मध्येही मोठा पूर आला होता. या पार्श्वभूमीवर उल्हास नदीच्या पूररेषेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. नदीच्या काठालगत असलेल्या मोकळय़ा भूखंडांवर नवनवी गृहसंकुले उभी रहात आहेत. कमी किमतीत घर मिळत असल्याने नागरिक घर

खरेदी करतात. मात्र, त्यांना या पूररेषेची कल्पना नसते. या पार्श्वभूमीवर नदीची पूररेषा निश्चित करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. अखेर

कोकण विभागीय जलसंपदा विभागाच्या ठाणे शाखेने जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उल्हास नदीच्या पुररेषेचे नकाशे जाहीर केले आहेत.

ज्या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते त्या ठिकाणाहून कर्जत, नेरळ, वांगणी, बदलापूर, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग, उल्हासनगर अशा भागाची पूररेषा जलसंपदा विभागाने निश्चित केली आहे. त्यासाठी विशेष नकाशे तयार करण्यात आले असून या नकाशांमध्ये गेल्या २५ वर्षांतील पूररेषेचा अभ्यास करून निळी रेषा निश्चित करण्यात आली आहे. तर गेल्या १०० वर्षांतील पुराचा अभ्यास करून लाल रेषा निश्चित करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे बदलापूर शहरातील झपाटय़ाने विकसित होणाऱ्या खरवई, चामटोली, सोनिवली, रमेशवाडी, हेंद्रेपाडा, वालिवली, एरंजाड आणि बदलापूर गाव या भागात शेकडो मीटर आतपर्यंत ही रेषा निश्चित केल्याचे दिसून आले आहे. विशेष बाब म्हणजे या भागात यापूर्वीच शेकडो गृहसंकुले उभी असून अनेक प्रकल्प प्रगतीपथावर तर काही प्रस्तावित आहेत. त्यामुळे येत्या काळात या प्रकल्पांनाही पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

‘एमएमआरडीए’च्या नियमावलीची गरज

बदलापूर शहर हे मुंबई महानगर प्रदेशात मोडत असल्यामुळे शहरातील नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी मुंबई महानगर विकास प्राधिकरणावर आहे. त्यामुळे गेल्या वर्षांत दोनदा पुराचा फटका बसल्यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेने पुर आलेल्या भागात इमारती उभ्या करताना खालचा मजला रिकामा ठेवण्यासाठी ठोस नियम हवेत, याबाबत मार्गदर्शन करणारे पत्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले होते. बदलापूर मुंबई महानगर प्रदेशात मोडत असल्याने नियोजन प्राधिकरण म्हणून त्यांच्याकडून याबाबत नियमावली हवी असे पालिकेचे मत आहे. मात्र गेल्या वर्षांत केलेल्या पत्रव्यवहाराला अद्याप ठोस उत्तर मिळाले नसल्याची बाब पालिकेच्या नगररचना विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील शेकडो इमारती आजही पुराच्या छायेखाली आहेत.

संकेतस्थळावर माहिती

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिक सेवा या पर्यायात नागरिकांना हे पूररेषेचे नकाशे पाहता येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी दिली आहे.