पर्यावरणतज्ज्ञांची भीती; नैसर्गिक नाले मोकळे करण्याची मागणी

वसई : वसईत पूरस्थिती निर्माण होणार असल्याची भीती पर्यावरणवादी आणि वसईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केली होती. ही भीती खरी ठरली असून भविष्यातही या शहरावरील जलसंकट कायम राहणार आहे, असे पर्यावरणवाद्यांकडून सांगण्यात आले आहे. आता तरी नैसर्गिक नाले मोकळे करा, नाल्यांवरची अतिक्रमणे जमीनदोस्त करा, अशी मागणी विविध पर्यावरणवादी संघटनांनी केली आहे.

सलग पाच दिवस वसईत पाणी साचल्याने जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. वसईवर हे जलसंकट येणार असल्याची भीती वसईतील विविध सामाजिक आणि पर्यावरणवादी संघटना अनेक वर्षांपासून व्यक्त करत होत्या. आता तरी जागे व्हा आणि वसईला वाचवा, असे वसई पर्यावरण संवर्धक समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी आम्ही एजन्सी नेमून वसईतील नैसर्गिक नाले शोधण्याची मागणी केली होती. ती पूर्ण करायला हवी, असे त्यांनी सांगितले. हे नाले शोधून त्याचा वसईच्या विकास आराखडय़ात उल्लेख करावा, असे ते म्हणाले. विरारच्या बोळींज येथील शापूरजी पालनजी गृह प्रकल्पाविरोधात वसई पर्यावरण संवर्धक समितीने आंदोलन केले आहे. या प्रकल्पामुळे बोळींज, उमराळे. नानभाट, मर्देस, नंदाखाल ही सहा गावे पाण्याखाली गेल्याचा आरोप त्यांनी केला.

हरित वसईचे आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीही या पूरपरिस्थितीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गुरुवारीही गिरीज परिसरातील पाणी ओसरलेले नाही ही अत्यंत शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी पाऊस कितीही पडला तरी पाणी ओसरत होते. कारण खारजमिनी होत्या. आज या खारजमिनींवर अतिक्रमणे होत आहे. नालासोपारा पूर्वेच्या भूमापन क्रमांक ४११ च्या १२ एकर खारजमिनीवर अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामुळे नालासोपारा शहरावर जलसंकट आल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे. डोंगरावरून येणारे पाणी वैतरणा खाडीत जात होते. आता मात्र जागोजागी भराव झाल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक नाल्यांचे रुंदीकरण, मार्ग बदललेले नैसर्गिक नाले पूर्ववत करणे, नाल्यावरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची मागणी त्यांनी केली.

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील गावांसाठी संघर्ष करणाऱ्या जनआंदोलन समितीनेही यासाठी महापालिकेला जबाबदार धरले आहे. आज गावागावात पाणी शिरू लागले आहे. यासाठी अतिक्रमणे करणारे, त्यांना आशीर्वाद देणाऱ्यांवर कारवाई करा, सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करा, अशी मागणी समितीचे प्रा. विन्सेट परेरा यांनी केली आहे.

आता बहुतेक बांधकाम व्यावसायिक राजकारणी झाले आहेत. काही बांधकाम व्यावसायिक राजकारणात नसले तरी राजकण्यांसोबत त्यांची अभद्र युती आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे होत असून त्यामुळेच वसईवर हे संकट ओढावले आहे.

– फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सामाजिक कार्यकर्ते