हरिनिवास सर्कल परिसरात वाहतूक कोंडी 

हरिनिवास सर्कल येथील जनकल्याण बँकेसमोरील प्रमुख चौकातील फुलवाल्यांनी दुकानापुढे सुमारे दहा फूट रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून बाजूलाच असणाऱ्या पदपथावर नागरिकांना चालण्यासाठी जागाही उरलेली नाही.

ठाण्यातील हरिनिवास सर्कल हा दाटीवाटीचा परिसर आहे. या ठिकाणाहून एक रस्ता सेवा रस्ता-हरित पथ, दुसरा रस्ता तीन हात नाका, तिसरा रस्ता नौपाडा तर चौथा रस्ता ओपन हाऊसच्या दिशेने जातो. या ठिकाणाहून जनकल्याण बँकेसमोरील मुख्य रस्त्यावरून ओपन हाऊसच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अनेक हॉटेल्स, खाण्याची दुकाने, मिठाईची दुकाने, कॅफे वगैरे असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात या परिसरात नागरिकांची रहदारी असते. मात्र या मार्गाकडे जाण्यासाठी असणाऱ्या हरिनिवास सर्कल येथील जनकल्याण बँकेसमोरील बसणाऱ्या फुलविक्रेत्यांनी चक्क अर्धा रस्ताच अडवला आहे. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

या भागात एकूण दोन फुलांची दुकाने आहेत. विक्रेते फुलांचे गुच्छ दुकानासमोर मांडतात. त्यांची संख्याही खूप मोठय़ा प्रमाणावर असते. दोन भल्यामोठय़ा छत्र्या ठेवून त्याखाली बुके ठेवले जातात. त्यामुळे अर्धा रस्ताच या फुलविक्रेत्यांनी अडविल्याचे दिसून येते. अनेक चारचाकी वाहने या ठिकाणी सजवटीसाठी येतात. त्यामुळे अनेकदा मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. तसेच रात्री दुकान बंद झाल्यानंतर हे फुलविक्रेते रस्त्यावर जमा झालेला फुलांचा कचरा उचलत नाही. फुलांचा कचरा त्याच ठिकाणी राहिल्याने परिसरात दरुगधी निर्माण होते. फुल विक्रेत्यांनी पदपथ अडवून ठेवल्याने नागरिकांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे एकंदरीत हरिनिवास सर्कल येथे असणारी परिस्थिती पाहता फुलविक्रेत्यांनी मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावरच अतिक्रमण केल्याचे पाहायला मिंळत आहे.