झेंडू ५० रुपये किलो; गतवर्षीच्या तुलनेत मात्र भाव कमीच

पितृपंधरवडय़ात कोमेजलेला फूलबाजार नवरात्रीच्या सुरुवातीलाच उत्साहाने फुललेला दिसला. मात्र यंदा फुलांची आवक अधिक प्रमाणात असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत सणासुदीच्या काळात फुले स्वस्त असतील, असा अंदाज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नवरात्रीत झेंडू ५० रुपये किलोने विकला जात आहे. गणेशोत्सव काळात ४०० रुपये किलोने विकली जाणारी गुलछडी नवरात्रोत्सवात ३५ रुपयांवर आली आहे. हे भाव दसऱ्याच्या आदल्या दिवशी नक्कीच वधारतील अशी माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली.

नवरात्रोत्सवात फुलांना मोठी मागणी असते. ठाणे, नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी जुन्नर, नाशिक, नगर या भागांतून येणारी फुले विक्रीसाठी उपलब्ध होतात. तसेच बंगळूरु, गुजरात येथून आलेल्या फुलांचा पुरवठाही होतो. या वर्षी फुलांची आवक अधिक असल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक होऊ लागला होता.

गणपतीत भाव कधी नव्हे इतके घसरले होते. त्यानंतर गणपती उत्सवात किरकोळ बाजारात गोंडा २०० रुपये किलोने विकला जात होता. पितृपंधरवडय़ात मात्र ग्राहकांकडून फुलांची मागणी कमी झाली. त्यामुळे झेंडू ५ रुपये किलो दराने विकला जात होता. नवरात्रोत्सवात मात्र किरकोळ बाजारात ५० रुपये किलोने झेंडू विकला जात आहे. आवक अधिक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पितृपंधरवडय़ात फुले माळशेज घाटात फेकून दिली होती.

गणेशोत्सवाच्या तुलनेत पावपटच दर मिळाल्याने फूलविक्रेत्यांची निराशा झाली आहे, अशी माहिती जुन्नरचे शेतकरी गणेश हांडे यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून फुलांचे भाव चढे असल्याची माहिती फूलविक्रेते सोपान काळे यांनी दिली. गेल्या आठवडय़ात कल्याण कृषी समितीत केवळ १० ते १५ फुलांच्या गाडय़ांची आयात होत होती, मात्र मंगळवारी तब्बल ५० गाडय़ांची आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे शामकांत चौधरी यांनी दिली.

सध्या घाऊक बाजारात १०० रुपये किलोने विकली जाणारी शेवंती किरकोळीत मात्र १२० रुपये किलोने विकली जात आहे. गणेशोत्सव काळात याच शेवंतीचे भाव किरकोळीत २५० रुपये किलो होते. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत हेही भाव कवडीमोलच होते, अशी माहिती फूलविक्रेते भुजंग पाटील यांनी दिली. दसऱ्याला तरी हे भाव वधारतील अशी आशा विक्रेते आणि शेतकरी करीत आहेत.

या वर्षी फुलांचे उत्पादन भरपूर असल्याने दर तुलनेने कमी आहेत. पितृपंधरवडय़ात १०-१५ गाडय़ांची आवक होत होती. मंगळवारी मात्र दिवसाला ५० गाडय़ांची आवक झाली आहे. तगर, जास्वंद, गुलछडी, झेंडू, गुलाब, मोगरा या फुलांना अधिक मागणी आहे.

– शामकांत चौधरी, कल्याण कृषी समिती, कल्याण