ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. तसेच जानेवारी ते मे महिन्यापर्यंत लग्नसराईचा काळ असतो. या काळात फुलांची मोठी मागणी असते. परंतु, सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध लागू करण्यात आल्याने फुलबाजार कोसळला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फुलबाजारात फुलांची विक्रीच होत नसून त्यामुळे फुले अक्षरश: कचऱ्यात फेकून द्यावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांमध्ये सजावटीकरिता शोभिवंत फुलांची मोठी मागणी असते. यामुळे फुलांचे किरकोळ व्यापारी दररोज मोठय़ा प्रमाणात घाऊक बाजारातून फुलांची खरेदी करतात. परंतु सध्या ही विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. कल्याण येथील फुलबाजारात मुख्यत: जुन्नर, अकोला, सांगली, सातारा, डहाणू येथून झेंडू आणि मोगरा ही फुले विक्रीसाठी येत असतात. तर, गुलाब, शेवंती, चाफा, अष्टर ही फुले आसपासच्या तालुक्यांमधून मागणीनुसार विक्रीसाठी येत असतात. लग्नसराईच्या काळात झेंडू, मोगरा, गुलाब या फुलांची चढय़ा दराने विक्री होते. सर्व फुलांची दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने विक्री होत होती. पण, सध्या कोणत्याच फुलांना मागणी नसल्याने ती ४० ते ७० रुपये किलो या दराने विकली जात आहे. किरकोळ फुलविक्रेत्यांनाही बंदी घातल्याने त्यांच्याकडून फुलांची खरेदी होत नाही. परिणामी, बाजारात शेतकऱ्यांनी आणलेल्या फुलांची विक्री न झाल्यामुळे  फुलविक्रेत्यांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे कल्याण येथील फुलविक्रेते पंकज रायते यांनी सांगितले.

हार, गजरे विकणाऱ्या महिलांपुढे आर्थिक संकट

मंदिर तसेच सभागृहांच्या परिसरात हार आणि गजरे विकणाऱ्या महिलांचा एक मोठा वर्ग आहे. त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून हार आणि गजरे खरेदील केले जायचे. परंतु, मागील काही दिवसांपासून लग्नसमारंभ आणि सभागृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने हार आणि गजरे विक्री करणाऱ्या महिलांपुढे आता मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

फुलांची मागणी नसल्याने विक्रीत मोठी घट झाली आहे. शेतकरी बाजारांमध्ये फुले विक्रीसाठी घेऊन येत आहेत. परंतु, योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नाही. शेतकरी मिळेल त्या भावात फुले विकत आहेत आणि उर्वरित फुले नाईलाजाने रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याचे चित्र आहे.

रविंद्र घोडविंदे, संचालक, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती

ऐन लग्नसराईच्या आणि सणासुदीच्या काळात कठोर निर्बंध लागू झाल्याने फुलांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. ३०० ते ४०० रुपये किलो दराने विकली जाणारी काही प्रकारची फुले सध्या ५० ते ६० रुपये दराने विकावी लागत आहेत.

– किशोर सावरगावकर, अध्यक्ष, महानगर व्यापारी फुलं-भाजी विक्रेता संघटना