25 April 2019

News Flash

माघी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर फुले महागली!

फुलांचे उत्पादन होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे.

(संग्रहित छायाचित्र)

थंडीमुळे उत्पादनावर परिणाम; दोन दिवसांत दरांत ३० ते ६० रुपयांची वाढ

ऋषीकेश मुळे, ठाणे

माघी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर फुलांची मागणी वाढली असतानाच बाजारपेठेतील आवक मात्र कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांवर दरवाढीचे संकट ओढावले आहे. पुणे, सोलापूर, नाशिक भागातील थंडीमुळे फुलांचे उत्पादन घटले असून जवळपास सर्वच प्रकारच्या फुलांचे भाव ३०-४० रुपयांनी वाढले आहेत.

माघ महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीच्या दिवशी अनेकांच्या घरी तसचे सार्वजनिक ठिकाणीही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा ८ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या माघी गणेशोत्सवानिमित्त फुले खरेदी करण्यासाठी ठाणे शहरातील जांभळी नाका, गोखले मार्ग येथील मुख्य बाजारपेठांत ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, फुले महागल्यामुळे खिशाला कात्री लागत असून त्यामुळे ग्राहकांनी खरेदीत हात आखडता घेतला आहे.

माघी गणेशोत्सवात गुलछडी, शेवंती, कापरी फुले, केवडा, चाफा या फुलांना अधिक मागणी असते. मात्र, यंदा कडाक्याच्या थंडीचे दुष्परिणाम फुलांच्या दर्जावर झाले आहेत. गुलछडीच्या किमतीत ३० ते ४० रुपयांनी वाढ होऊन ती २०० रुपये किलोवर पोहोचली आहे. केवडय़ाच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली असून तो १५० रुपयांना विकला जात आहे.

दूर्वा आणि तुळस गणेशपूजेत आवश्यक असतात. मात्र त्यांच्या किमतीही चार ते पाच रुपयांनी वाढल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात हा दर अधिक  वाढणार असल्याचे फुलविक्रेत्यांचे म्हणणे आहे.

फुलांचे उत्पादन होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. त्यामुळे अपेक्षित प्रमाणात आणि चांगल्या दर्जाची फुले येत नसल्याचे पुणे जिल्ह्य़ातील शेतकरी निखिल होले यांनी सांगितले. परिणामी ठाणे शहरातील घाऊक बाजारपेठेत येणाऱ्या फुलांची आवक कमी झाली आहे. मागणी वाढली असताना आवक कमी झाल्याने ग्राहकांना चढय़ा दराने फुले विकत घ्यावी लागत आहेत.

 

दोन दिवसांत फुलांच्या दरांमध्ये झालेली वाढ

फुलाचा प्रकार          सोमवार       गुरुवार

झेंडू                           ६०     ८० रुपये किलो

गुलछडी                    १४०    २०० रुपये किलो

शेवंती                       ११०    १६० रुपये किलो

कापरी फुले/              ६०     १०० रुपये किलो

तुळजापुरी फुले

केवडा                       १००    १५० रुपये बंडल

चाफा                       २५०    ३०० रुपये शंभर नग

दूर्वा                          ७      १० रुपये जोडी

तुळस                      १५     २० रुपये बंडल

फुलांची आवक कमी आहे. माघी गणेशोत्सवाला अजून एक दिवस बाकी आहे. फुलांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. दर कमी करून ग्राहकांना फुले विकता येत नाहीत.

-महाराजा फुलविक्रेता

 

फुलांच्या दरांमध्ये खूपच वाढ झाली आहे. फुलविक्रेते दर कमी करायलाही तयार नसतात. सणासाठी फुले अपरिहार्य आहेत. महाग फुलांमुळे खिशाला कात्री लागत आहे.

-विनायक जोशी, ग्राहक

First Published on February 8, 2019 1:37 am

Web Title: flowers expensive on occasion of maghi ganeshotsav