स्थानिक राजकारणात कोणत्याही कामाचं श्रेय स्वतःचं प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी नेते मंडळी काय करतील यांचा नेम नाही. पण, स्थानिक नेत्याच्या काही गोष्टींमुळे अनेकदा गंमतीशीर घटना घडून जातात. मुंबई नाशिक महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डापूलाच्या उद्घाटनावरूनही असाच मजेशीर प्रसंग घडला आहे. एकाच दिवसात तीन नेत्यांनी या उड्डाणपूलाच उद्घघाटन केलं. यात आमदार आणि महापौरांचाही समावेश आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोळी-माणकोली बायपासवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत होती. यावर उपाय म्हणून बायपासवर उड्डाणपूल उभाण्याचा निर्णय २०१३मध्ये घेण्यात आला. काही दिवसांपूर्वीच या पुलाचं काम पूर्ण झाले आहे. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने उद्घाटन लांबणीवर पडले होते. त्यामुळे हा उड्डाणपूल सध्या बंदच आहे.

दरम्यान, सोमवारी या उड्डाणपूलाचं एकाच दिवशी तीन वेळा उद्घाटन करण्यात आले. सुरूवातीला आगरी सेवा संस्था राजकीय संघटनेचे नेते यशवंत पाटील यांनी उड्डाणपुल उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला केला. “स्थानिक नेत्यांना केवळ व्यासपीठावर बसून लोकांची गर्दी जमवायला आवडते. त्यांना वाहतूक कोंडीविषयी काहीही देणंघेण नाही,” असं ते म्हणाले.

यशवंत पाटील यांनी उद्घाटन केल्यानंतर सायंकाळी पुन्हा भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्यासह भिवंडीच्या महापौर जावेद दळवी यांनी उड्डाण पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला. फित कापून पुल खुला केल्यानंतर पाटील म्हणाले, “आम्ही प्रयत्न केल्यामुळेच हा उड्डाणपूल पूर्ण झाला आहे. यामुळे नागरिकांचा १५ ते २० मिनिटं वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर हा पूल नागरिकांसाठी असून, आम्ही सर्व आपआपल्या मार्गानं जनतेसाठी काम करत आहोत,” असंही ते म्हणाले.

खासदार कपिल पाटील हे उद्घाटन करून गेल्यानंतर समाजवादी पार्टीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला. स्थानिक नागरिकांकडून सातत्यानं हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. मात्र, कुणीही याची दखल घेत नव्हतं. त्यामुळे आम्हीच पुढाकार घेऊन हा पूल खुला केला, असं समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर सांगितलं.

गंमत म्हणजे ‘एमएमआरडीए’नं हा उड्डाणपूल उभारला आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात येते. मात्र, तीन वेळा उद्घाटन होऊन याची माहिती एमएमआरडीएला नाही. “उड्डाणपूलाचं काम पूर्ण झालं असून, आम्ही त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली आहे. उद्घाटन करण्यात आल्याची कोणतीही माहिती आम्हाला नाही,” असं एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनं सांगितलं.