९८ मंडपांमध्ये अन्न व औषध प्रशासनाची तपासणी; जिल्ह्यतील ९ मिठाई दुकानांचीही पाहणी

गणेशोत्सवाच्या काळात प्रसाद म्हणून वाटल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामधून नागरिकांच्या आरोग्यास अपाय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने प्रसादाची तपासणी करण्यासाठी छापेसत्र आरंभले आहे. आतापर्यंत जिल्ह्यतील ९८ गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांत जाऊन तेथील प्रसाद बनवण्याचे साहित्य, भांडी व जागेची तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्रसादामध्ये भेसळ आढळली नसली तरी, प्रशासनाने आपली मोहीम कायम ठेवण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यतील नऊ मिठाईच्या दुकानांचीही अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली. यात ठाण्यातील प्रशांत कॉर्नर. बिकानेर, कृष्णा आदी मिठाईच्या दुकानांचा समावेश आहे. त्यातील प्रशांत कॉर्नरमधील स्वच्छता असमाधानकारक असल्याचा शेरा प्रशासनाने दिला. तसेच कृष्णा व बिकानेर दुकानांत परवानापत्र लावले नसल्याचे आढळून आले.

मंडळांना प्रसाद बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, अन्नपदार्थ, परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकणबंद असावीत. आवश्यक तेवढाच प्रसाद बनवावा. प्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकाने टोपी, हातमोजे आदी गोष्टींचा वापर करावा, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात १० साहाय्यक आयुक्तांच्या देखरेखीखाली अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची ही मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक साहाय्यक आयुक्तांच्या ताफ्यात चार उपसाहाय्यक आयुक्त असल्याची माहिती प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी सुरेश देशमुख यांनी दिली.

बिकानेर, कृष्णा, प्रशांत कॉर्नर अशा नामवंत मिठाईवाल्यांकडे जाऊन पाहणी आणि पदार्थाची पडताळणी केल्याचे सांगण्यात आले. या वेळी प्रशांत कॉर्नर येथे उत्पादन कक्षातील सांडपाण्याची व्यवस्था, कचरा साठविण्याची जागा आणि प्रसाधनगृह योग्य त्या अंतरावर नाहीत. तसेच त्यांना गंजलेली पातेली, अस्वच्छ यंत्रसामग्री, झुरळांचा वावर आढळून आला. मिठाई बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी केला जात नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

प्रशांत कॉर्नरची दुकाने प्रशस्त आहेत. त्यामुळे ही दुकाने कोणत्याही प्रकारे अस्वच्छ नाहीत. मात्र ज्या ठिकाणी पदार्थ तयार होतात तेथे मात्र अतिशय अस्वच्छता असल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसांत ‘प्रशांत कॉर्नर’ यांच्या खाद्यपदार्थाबाबत तक्रारीदेखील वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने कारवाई केली. 

– सुरेश देशमुख, सहआयुक्त , अन्न आणि औषध प्रशासन

अन्न व औषध विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. स्वच्छता कमी असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आम्ही स्वच्छतेची व्यवस्था करून घेतली आहे. तसेच अन्न व औषध विभागातर्फे पाठविण्यात आलेल्या नोटीसला उत्तरही देण्यात आले आहे. 

प्रशांत सकपाळ, प्रशांत कॉर्नर मालक