प्रत्येक संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे तेथील खाद्यपदार्थ. विविध प्रांतातील खाद्यपदार्थ खाऊन पाहिले की तेथील संस्कृती कळत जाते. सध्याच्या जीवनशैलीनुसार चांगलंचुंगलं, चविष्ट व मसालेदार खाण्यापिण्याचं प्रमाण वेगाने वाढताना दिसतंय.

या बदलत्या चवीचे चोचले पुरविणारे एक नवे जंक्शन म्हणजे पाचपाखाडी येथील ‘ट्विस्टी रॅप्स’. मूळचे ठाणेकर असलेले सेफ साहिल सोनवडेकर यांनी काही महिन्यांपूर्वीच सुरू केलेल्या या स्टॉल्सने ठाण्यातील या खाऊनाक्याच्या श्रीमंतीत भर टाकली आहे. अल्पावधीतच या कॉर्नरने नेटबिंबावर चार तारे कमविले आहेत. साहिल सोनवडेकर यांनी स्विर्झलडहून हॉटेल व्यवस्थापनाचे धडे घेतले. त्यानंतर अनेक देशांमधील पंचतारांकित हॉटेल्समध्ये यशस्वीरीत्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी भारतात परतून त्यांनी ठाण्यात अमेरिकन-इटालियन फ्यूजन खाद्य पदार्थाचे ‘ट्विस्टी रॅप्स’ सुरू केले.
अमेरिकेसारख्या आधुनिक देशाला स्वत:ची अशी पारंपरिक खाद्यसंस्कृती नाही. अमेरिकन पदार्थ युरोपियन प्रभावामधूनच आले आहेत, तरीही त्यांची अमेरिकन क्युझीन अशी एक स्वतंत्र ओळख आहे. आपण खातो तो बर्गर, हॉटडॉग, सॅण्डविचेस याचे मूळ अमेरिकेत आहे. आधुनिक काळात ज्याला फास्ट फूड म्हटले जाते, त्याचा जन्म अमेरिकेतच झाला. किचनमध्ये कमीत कमी वेळेत बनवता येतील अशा फ्रोझन फूडला सुरुवात अमेरिकेतच झाली. अशा या सुपरिचित अमेरिकन खाद्य संस्कृतीत थोडा बदल करून नवीन पदार्थ देण्याचा प्रयत्न ‘ट्विस्टी रॅप्स’द्वारे साहिल सोनवडेकर यांनी केला आहे.
अमेरिकेमध्ये धावपळीची जीवनशैली असल्याने लोक चालता-चालता खाणे पसंत करतात. हल्ली भारतातही हा प्रकार रुळू लागला आहे. मैद्याच्या चपातीमध्ये विविध पदार्थाचे सारण भरून केलेल्या रोलला ‘रॅप’ असे म्हणतात. ‘ट्विस्टी रॅप्स’चे वैशिष्टय़ म्हणजे हे अमेरिकन व्रॅप्स इटालीयन पद्धतीने बनवले जातात.
पदार्थाविषयी..
व्रॅप : मिंट मायो (मॅओनिजचा प्रकार), चिकनचे तुकडे, कांदा आणि टोमॅटोसोबत एकत्र करून विविध देशी-विदेशी मसाले वापरून चटकदार असा ‘चिकन टिक्का रॅप’ हा पदार्थ तयार केला गेला आहे. अमेरिकन आणि भारतीय पद्धतीने ‘चिकन रेशमी रॅप’ आणि ‘चिकन सिक कबाब रॅप’ हे पदार्थ तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे येथे भेट देणाऱ्या खवय्यांच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे ‘टेंडर फ्राइड चिकन रॅप’. येथील आंबड-तिखट लज्जतदार असा पीरी-पीरी रॅप हा पोर्तुगीज पद्धतीने बनवला गेला आहे. या पदार्थामध्ये दक्षिणात्य पद्धतीने तयार केलेल्या चिकनमध्ये मिश्र पद्धतीच्या मसाल्यांचा वापर केला जातो. येथील ‘तेरियाकी चिकन’ हा आणखी एक प्रसिद्ध पदार्थ. हा पदार्थ एका विशिष्ट पद्धतीने भाजून त्यावर तेरियाकी मसाल्यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर व्रॅप्समध्ये काठी चिकन रॅप, क्लासिक क्यूब रॅप, एग्ग रॅप (अंडे वापरून बनवलेले), पनीर टिक्का, मखमली टिक्का रॅप, चिज कॉर्न रॅप, आदी विविध प्रकारचे रॅप खवय्यांसाठी येथे उपलब्ध आहेत.
पास्ता इन ए बॉक्स : पास्ता इन ए बॉक्स यामध्ये एक विशिष्ट आकाराच्या बॉक्समध्ये विविध चटकदार चविष्ट असे पाश्त्याचे प्रकार खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पाश्त्यामध्ये अल अरबिटा, क्रिमी व्हाइट पास्ता, अल अरबिटा क्रीम, अ‍ॅलफ्रेडो चिकन, अ‍ॅलफ्रेडो मशरुम आदी प्रकार उपलब्ध आहेत.
सॅलेड्स : त्याचबरोबर येथे पाश्चिमात्य पद्धतीने तयार केलेले चविष्ट असे सिझर सॅलेडची चवही चाखायला मिळते.
त्याचप्रमाणे येथे स्पायसी चिकन विंग्स, क्रिस्पी टेंडर चिकन फ्राइस्, गार्लिक ब्रेड विथ चीज, उपलब्ध आहे. येथील चविष्ट पदार्थाच्या यादींमध्ये ब्रुशचेटा विथ ऑलिव्ह, सालसा अ‍ॅण्ड चीज हा सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे.
वेळ – दुपारी १.३० ते रात्री १०.३०.

पिझ्झा
पिझ्झा हा पदार्थ हल्ली बहुसंख्य खवय्यांच्या जिभेवर प्रभाव टाकून आहे. ‘टिव्स्टी रॅप्स’च्या पिझ्झाचे वैशिष्टय़ म्हणजे पिझ्झाबेस (पाव) अतिशय पातळ आकाराचा असतो. जेणे करून ओव्हनमध्ये भाजल्यावर तो अधिक कुरकुरीत होतो. येथील पिझ्झ्याचा आकार इतरांच्या तुलनेत मोठा असल्याच्या दावा साहिल सोनवडकर यांनी केला आहे. क्लासिक मॉझरिला, वेजी रश, पनीर टिक्का, ग्रिल्ड चिकन, चिकन टिक्का, बार्बेक्यू चिकन आदी प्रकारचा पिझ्झा येथे उपलब्ध आहे.