News Flash

‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’

भा रतीय संस्कारात पूर्वीपासून अन्नग्रहण करण्याच्या कृतीस केवळ जीवधर्म न समजता त्यास आध्यात्मिक अधिष्ठान दिलेले आहे

भा रतीय संस्कारात पूर्वीपासून अन्नग्रहण करण्याच्या कृतीस केवळ जीवधर्म न समजता त्यास आध्यात्मिक अधिष्ठान दिलेले आहे, कारण आपण जे खातो, जेवतो हे केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी करत नसून, त्यापासून आपल्याला शक्ती म्हणजे ऊर्जा मिळत असते हे आपल्या पूर्वजांना प्राचीन काळापासून माहिती होते. जेवण्याच्या अगोदर ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोकम्हणताना शेवटी आपण ‘‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’. ही ओळ म्हणून जेवणास सुरुवात करतो. जेवण हे यज्ञासारखेच पवित्र आणि अग्नी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे आहे हा विचार आपण मांडत असतो.

पोटात गेलेल्या अन्नापासून ऊर्जा कशी मिळते ते आपण शालेय विज्ञान अभ्यासक्रमात पचनसंस्था या भागात शिकलेलो आहोत. अन्नातून निर्माण झालेले ग्लुकोज आपल्याला ऊर्जा देते एवढी ढोबळ माहिती आपल्याला असते. परंतु या सर्वाची एक गुंतागुंतीची आणि सूक्ष्म यंत्रणा असते, याची आपल्याला कल्पना नसते. या यंत्रणेचा अभ्यास करून त्यापासून रोगनियंत्रण शक्ती शरीरात निर्माण करण्याचे संशोधन आज जागतिक पातळीवर सुरू आहे. या संशोधनात सहभागी आहे लग्नानंतर ठाण्याची सून झालेली डॉ. रसिका वर्तक-करंदीकर.
रसिका सध्या जगातील अतिशय प्रतिष्ठित असलेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया येथे या विषयावरचे संशोधन करीत आहे. मुंबई विद्यपीठातून सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पदवी ग्रहण करून रसिकाने पुणे विद्यापीठातून आरोग्य विषयातून उच्च शिक्षण घेतले. हे घेताना तिने प्राध्यापक सुखात्मे शिष्यवृत्ती मिळवण्याचा मान मिळावला होता. यानंतर तिने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील टेक्सास हेल्थ सेंटर, सॅन अन्तिनो येथे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २००८ साली प्रवेश घेतला. २००८-०९ या काळात रसिकाला विशेष गुणवान विद्यर्थ्यांला मिळणारी डेव्हिड कॅरिलो शिष्यवृत्तीचा सन्मान लाभला होता. २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षांत तिला बरोज वेलकमची विशेष शिष्यवृत्ती मिळाली होती.
लेखाच्या सुरुवातीस नमूद केल्याप्रमाणे आपण खाल्लेल्या अन्नापासून ग्लुकोज निर्माण होते. हे ग्लुकोज आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. आपल्या अन्नात कबरेदके, प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ यांचा समावेश असतो. या घटकांचे आपल्या पेशींमधील विशिष्ट जैविक रसायनामुळे विघटन होते. हे विघटन होताना नवीन वाटा निर्माण होतात. या वाटा आपल्या शरीरात असणाऱ्या लक्षावधी पेशींमधील मिटोचोंड्रिया या अतिसूक्ष्म ऑरगॅनेलेसमध्ये शिरकाव करतात. उत्क्रांतीच्या ओघातील प्रथम एक पेशीय जीव हे यांचे मूळ वंशज. आपल्या पेशींमधील हे ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत. यामध्ये ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया अतिशय तांत्रिक आहे. याला एटीपी जनरेशन म्हणतात. माटकोनड्रियामध्ये शिरकाव करून घेतलेला वरील घटक आपल्याबरोबर असलेल्या इलेक्ट्रोन, पाच रेसपिरटोरी कॉम्प्लेक्समधून जातात. यांची १, २’ ३’ ४’ ५’ अशी सरळ गणना केली जाते. या कॉम्प्लेक्समधील घटकांमध्ये जर दोष निर्माण झाला तर पेशींमधील ऊर्जा संपून पेशी नाश पावतात. त्याचा परिणाम साहजिक त्या त्या अवयवांवर होतो आणि रोगांना निमंत्रण मिळते.
या पुढील गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणजे कॉम्प्लेक्समधील कॉम्प्लेक्स १, हा सर्वात मोठा घटक आहे. इंग्रजी ‘एल’सारखा त्याचा आकार असतो आणि त्यामध्ये प्रथिनांची एनडी १ ते एनडी ४५, असे ४५ उपघटक असतात. या उपघटकांमधील एनडी १, ४, ५ आणि ६, हे साधरणत: दुर्बल अथवा अकार्यशील असतात आणि यामुळे कॉम्प्लेक्स १, हे कमजोर होते.
रसिकाचा पीएच.डी.चा संशोधनाचा विषय हा कॉम्प्लेक्स १च्या जडणघडणीचे गूढ उलगडणे हा होता. ४५ उपघटकांचा सहभाग असलेल्या कॉम्पलेक्स १मध्ये एकमेकांशी समन्वय साधण्याची निश्चित एखादी पद्धत असणार. ही पद्धत शोधण्यासाठी तिने एनडी १, ४, ५ आणि ६, या उपघटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा अभ्यास केला. अभ्यासातून तिने कॉम्प्लेक्स १मधील वरील उपघटकांची जडणघडण शोधून काढली. यातील दूषित उपघटकामुळे कॉम्प्लेक्स १वर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास तिने केला.
संशोधन करण्याची संधी
रसिकाच्या या संशोधनामुळे तिला प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यपीठातील आरोग्य संशोधन केंद्रात पारकिन्सन आणि अल्झायमर या रोगांवर संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. मानवी शरीरातील होणाऱ्या पेशींच्या नाशाचे कारण हे अनेक रोगांचे मूळ असते. रसिकासारख्या या विषयावर सखोल संशोधन करणाऱ्या संशोधकांमुळे अनेक घातक रोगांवर उपचार उपलब्ध होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 8:30 am

Web Title: food greedy
Next Stories
1 कानसेन,प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा सुरेल अभियंता
2 शिवसेना की भाजपचे ‘कल्याण’?
3 ‘ते’ चौघे नगरसेवक फरारी
Just Now!
X