ठाण्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तीनहात नाक्यावर चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची नेहमीच रेलचेल असते. महाराष्ट्रातील हा सर्वात वर्दळीचा चौक मानला जातो. त्यामुळे पादचाऱ्यांना तो पार करताना बरीच कसरत करावी लागते. एकाच वेळी चारही बाजूंच्या वाहनांकडे लक्ष ठेवून आपल्या दिशेकडे धाव घेणारे नागरिक येथे नेहमीच पहायला मिळतात. अनेकदा वाहनांमुळे त्यांना बराच वेळ येथे खोळंबून राहावे लागते. गेले काही दिवस मीसुद्धा त्याचा अनुभव घेत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना हा चौक ओलांडताच येत नाही. त्यामुळे अगदी जवळ जायचे असले तरीही नाईलाजाने त्यांना रिक्षा करावी लागते. खरेतर या ठिकाणी भुयारी मार्गाची आवश्यकता आहे. भविष्यात तो होईलही. तूर्त येथे एखादा पादचारी पूल तातडीने उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल, शिवाय त्यांचा प्रवासही निर्धोक होईल. ठाणे महापालिकेच्या वतीने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यात सुरू आहेत. त्यात तातडीने हा एक प्रकल्प मार्गी लावला तर बऱ्याच नागरिकांची सोय होऊ शकेल. कारण तीनहात नाका म्हणून जुन्या-नव्या ठाण्यातील महत्त्वाचे जंक्शन आहे.