फाटक बंद झाल्याने एकमेव पादचारी पुलावरील भार वाढणार

डोंबिवलीतील एकमेव उड्डाणपुलावर वाहनांची होणारी कोंडी आणि रेल्वे फाटकामुळे मध्य रेल्वेच्या गाडय़ांचे कोलमडणारे वेळापत्रक यावर उपाय म्हणून ठाकुर्ली स्थानक परिसराजवळ डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी बांधण्यात येणारा उड्डाणपूल अंतिम टप्प्यात आला आहे. उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील रेल्वे फाटक बंद केले जाईल, असे नियोजन आहे. मात्र हे फाटक बंद झाल्यास रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. ठाकुर्ली स्थानकातून डोंबिवली दिशेकडे जाण्यासाठी सद्य:स्थितीत उपलब्ध असलेला एकमेव पादचारी पूल अरुंद असून तो अपुरा पडण्याची चिन्हे आहेत.

ठाकुर्ली फाटकामुळे रेल्वे गाडय़ांच्या वेळेत होणारी दिरंगाई आणि दिवसेंदिवस फाटकाचा वापर करणाऱ्या वाहनांची वाढणारी संख्या पाहून यावर तोडगा म्हणून डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला ठाकुर्ली फाटकातून जोडणारा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला. पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा दुसरा उड्डाणपूल असला तरी लोकल गाडय़ांचे वेळापत्रकही नियमित करणे शक्य होणार असल्याने युद्धपातळीवर या पुलाचे काम करण्यात आले.

या पुलामुळे रेल्वेची वाहतूक जलद होणार असली तरी, प्रवाशांना मात्र अडथळे पार करावे लागणार आहे. ठाकुर्ली स्थानकात जाण्यासाठी एकमेव पादचारी पूल असल्याने अनेक प्रवासी फाटकामधून रेल्वे रूळ ओलांडून स्थानक गाठतात. आता फाटक बंद झाल्यास या प्रवाशांना पादचारी पुलाची वाट धरावी लागणार आहे. मात्र हा पादचारी पूल अरुंद असल्याने प्रवाशांच्या गर्दीसाठी तो अपुरा पडण्याची भीती आहे.

रेल्वे, महापालिकेत वाद

ठाकुर्ली उड्डाणपुलाचा मूळ उद्देश फाटक बंद करणे असला तरी रेल्वे प्रशासनाकडून जोपर्यंत डोंबिवली पश्चिमेच्या ५२ चाळ परिसरातून मार्ग बांधून दिला जात नाही तोवर फाटक बंद केले जाणार नाही, अशी भूमिका कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घेतली आहे. शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला.