पादचारी पूल धोक्याचेच

ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वे स्थानकांबाहेरील पादचारी पुलांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या पुलांवरील फरशा उखडल्या आहेत, तर रात्रीच्या वेळी प्रेमी युगुले आणि गर्दुल्ल्यांनी या पादचारी पुलांना आपला अड्डा बनविल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे. या पुलावर सुरक्षारक्षकदेखील तैनात नसल्यामुळे प्रवासी भीतीच्या सावटाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

पादचाऱ्यांना तसेच प्रवाशांना स्थानक गाठता यावे यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून स्थानकांबाहेर पादचारी पूल बनविले आहेत. मात्र, या पादचारी पुलाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेले पश्चिम आणि पूर्व दिशेला जोडणारे पादचारी पूल सकाळी आणि सायंकाळी गर्दीने ओसंडून वाहत असतात. पश्चिम दिशेकडे असणाऱ्या पादचारी पुलावर सिमेंटने डागडुजी केली असली तरीही तेथील फरशा निघालेल्या आहेत.

पूर्व दिशेला मंगला हिंदी शाळेकडे जाणाऱ्या पादचारी पुलाच्या काही भागांचे संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी तेथे प्रेमी युगुले आणि फेरीवाल्यांचा मोठय़ा प्रमाणात वावर असल्याने तेथील प्रवाशी पादचारी पुलाचा वापर करणे टाळत आहेत.

डोंबिवली येथे पश्चिम दिशेला इंदिरा चौकाकडे जाणाऱ्या पादचारी पुलावर फे रीवाले खाद्यपदार्थ आणि वस्तूंची विक्री करताना दिसतात. सकाळी आणि रात्रीच्या वेळी पश्चिम आणि पूर्व दिशेकडील पादचारी पुलावर पादचारी गर्दीचा सामना करत असल्याचे केतन कुलकर्णी या रहिवाशाने सांगितले.

कल्याण पश्चिमेकडील स्थानकाबाहेरील पादचारी पुलाचीदेखील दुरवस्था झाली आहे. पुलावरील फरशा आणि पत्रे निघालेल्या अवस्थेत आहे. या पुलावर फे रीवाले आणि गर्दुल्ले यांचे साम्राज्य पसरलेले आहे. चालण्याची जागा फेरीवाल्यांनी अडवल्याने पादचारी पूल फेरीवाल्यांसाठी आहेत की पादचाऱ्यांसाठी, असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.

उल्हासनगर येथील पूर्वेकडील नानासाहेब धर्माधिकारी पादचारी पुलाच्या सुरुवातीस संरक्षक कठडे नसल्याचे निदर्शनास येत आहे. फेरीवाले, गर्दुल्ले आणि प्रेमी युगुलांचा वावर असतो यामुळे प्रवासी त्रस्त झालेले आहेत. हीच परिस्थिती पश्चिम दिशेला असणाऱ्या पादचारी पुलावर पाहाण्यास मिळते.

कल्याण पश्चिमेला असलेल्या पादचारी पुलावर सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे. रात्री विक्रेत्यांमुळे चालणे अवघड होते– आनंद लेले,  प्रवासी, कल्याण

ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिम दिशेकडे असणाऱ्या पादचारी पुलांच्या फरशा उखडलेल्या अवस्थेत आहेत तसेच फेरीवाल्यांचा वावर असल्याने त्रास होतो. – पुष्पा कुलकर्णी, प्रवासी, ठाणे