लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या विक्रेत्यांकडून पदपथाचा वापर चक्क दुचाकी वाहनतळाकरिता करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना पदपथावरून ये-जा करणे अवघड झाले असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता गोल्डन नेस्ट ते काशिमीरा चौकापर्यंत लांब आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून या रस्त्याभोवती पदपथांची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणात दुकाने व मॉल्सची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या विक्रेत्यांकडून पदपथाचा वापर चक्क खासगी दुचाकी वाहनतळाकरिता करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पायी प्रवास करणे अवघड झाले आहे.

शहरातील पदपथावर दुचाकी उभी करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला पूर्वीदेखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पदपथांची अवस्था बिकट झाली असून नाल्यावरील झाकणे तुटण्यास हे मुख्य कारण ठरत आहेत. त्यामुळे या समस्येकडे पालिका प्रशासनासह वाहतूक पोलिसांकडून लक्ष देण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शहरातील पदपथावरून नागरिकांना चालणे अवघड झाले असताना कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे.
– दिलीप भाबड, स्थानिक नागरिक

पदपथावरील गाडय़ा उचलण्याचे पत्र वाहतूक विभागाला देण्यात आले असून त्यानुसार कारवाई सातत्याने सुरू आहे.
– यतीन जाधव, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग